सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहरातील सर्व रुग्णालयांनी फायर व विद्युत ऑडिट रिपोर्ट सादर करावा. अग्निशमन कायदा, नियमांचे पालन न केल्यास रुग्णालये, नर्सिंग होम, वैद्यकीय महाविद्यालये व इतर वैद्यकीय आस्थापनांवर कारवाई होऊ शकते. पाणी पुरवठा, वीज खंडित करणे तसेच प्रसंगी इमारत सील करण्याची कार्यवाही होऊ शकते, असा इशारा महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिला आहे.
सोनोने म्हणाले, मुख्य अग्निशमन अधिकारी पदावर रुजू होताच सांगली व मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल तसेच इतर चार ठिकाणी अग्निशमनबाबत माहिती व मॉक ड्रील घेतले. तपासणीदरम्यान अग्निसुरक्षिततेबाबत काही उणिवा निदर्शनास आल्या आहेत. एकाही रुग्णालयाने फायर ऑडिट केले नसल्याचे आढळून आले.
अमरावती येथील हॉस्पिटलमधील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातही तशी दुर्घटना घडू नये यासाठी महापौर धीरज सूर्यवंशी, आयुक्त संजीता महापात्र यांच्या पूर्वपरवानगीने मिरज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सारा धनवडे, सरचिटणीस डॉ. पृथ्वीराज मेठे तसेच सांगली इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. वसुधा जाधव यांच्यासमवेत अग्निशमन मुख्यालयात बैठक घेतली. शहरातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट व विद्युत ऑडिट करून तो रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर अग्निशमन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
निवासी इमारती, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक व औद्योगिक इमारतींचे मालक, धारक, विकासक तसेच प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने आपल्या वास्तूचे फायर ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. फायर ऑडिटनुसार आवश्यक अग्निशमन यंत्रणा बसविणे तसेच बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक कायद्यानुसार कार्यरत ठेवणे बंधनकारक आहे. अधिकृत एजन्सीमार्फत अग्निशमन यंत्रणेची दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात तपासणी करून घेणे आवश्यक असते. अग्निशमन यंत्रणा सुरळीत व कार्यरत असल्याचे नमुना 'ब' प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडे सादर करणे बंधनकारक असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी सोनोने यांनी स्पष्ट केले.