सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : महापालिकेची आजची महासभा गाजणार

भटकी कुत्री, बंद पथदिवे, अपुऱ्या मुरमाचे पडसाद उमटणार : उद्याने चालवायला देण्याचा विषय वादग्रस्त ठरणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले, बंद पथदिव्यांमुळे पसरलेले अंधाराचे साम्राज्य, अपुरा मुरूम, महापालिकेची उद्याने संस्था, कंपन्यांना चालवण्यास देण्याचा विषय यासह अन्य काही विषयांवरून गुरूवारी महापालिकेची महासभा गाजणार असे चित्र दिसत आहे. बुधवारी महापालिकेत झालेल्या पार्टी मिटींगमध्येही अनेक नगरसेवकांनी या विषयांवरून प्रशासनाला धारेवर धरले.

पावसामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. दलदल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थायी समितीने आदेश देऊनही प्रभागांमध्ये पावसाळी मुरूम टाकण्यात येत नसल्याबद्दल नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. पुरेसा मुरूम न टाकल्याने नागरिक जाब विचारत आहेत, प्रभागात फिरणेही अवघड झाले आहे, अशी व्यथा अनेक नगरसेवकांनी भाजप-राष्ट्रवादीच्या संयुक्त पार्टी मिटींगमध्ये मांडली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लहान मुले आणि नागरिक भयभीत झाले असून, महापालिका प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. हा विषय महासभेत गाजणार आहे.

बंद पथदिव्यांच्या प्रश्‍नावरून नगरसेविकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. गणेशोत्सव जवळ आला असताना अनेक प्रभागांमध्ये दिवे बंद आहेत. कंपनी आणि प्रशासनातील वादामुळे दिवे दुरुस्त होत नसल्यावरून संताप व्यक्त करण्यात आला.

सेवानिवृत्त शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकातील जानेवारी २००६ ते २०१० मधील महापालिका हिश्श्याची ५० टक्के रक्कम म्हणून ४.३३ कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर आहे. महापालिकेच्या मालकीची जागा आणि एमएसईबीकडील जागा यांची अदलाबदल करण्याचा विषय सभेपुढे आहे.

शहरातील विविध उद्याने सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांकडे देखभालसाठी देण्याचा प्रस्ताव महासभेसमोर आहे. उद्याने संस्थांकडे देताना कोणत्या अटी-शर्ती असतील, देखभालीचा दर्जा कसा राखला जाईल, नागरिकांना कोणत्या सुविधा मिळतील याबाबत सदस्यांकडून प्रशासनाला जाब विचारला जाईल, असे दिसत आहे. शामरावनगरमधील दफनभूमीची काही जागा क्रीडांगणासाठी देण्याचा ठराव यापूर्वी झाला आहे. त्याविरोधात फिरोज पठाण यांच्यासह काही नगरसेवकांनी प्रस्ताव आणला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT