सांगली : विषयपत्रिकेवरील विषय चर्चेविना मंजूर केले जाऊ लागल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांसमोरील डायसपुढे येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. (छाया : सचिन सुतार) 
सांगली

Sangli News : महासभा गुंडाळली; भाजप-काँग्रेस भिडली

सत्ताधाऱ्यांकडून गदारोळातच सर्व विषय मंजूर; 'महापौर पळालेऽऽ'ची काँग्रेसची घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पंधराव्या वित्त आयोगाच्या १५ कोटींच्या निधीवरून महासभेत खडाजंगी झाली. त्यानंतर लगेचच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती योजनेच्या २३ कोटी रुपयांच्या कामांवरूनही काँग्रेसकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. त्याला महापौरांनी दाद दिली नाही. विषय मंजूर करत पत्रिकेवरील पुढचे विषय वाचण्यास सांगत सभेचे कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्याला काँग्रेस नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. त्यावर महापौरांनी सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत महासभेचे कामकाज संपवून सभागृहाबाहेर पडले. सभा गुंडाळल्याने काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाले. महापौर पळाले, अशा घोषणांनी काँग्रेस नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले.

महापालिकेत गुरुवारी महासभा झाली. महापौर धीरज सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त संजीता महापात्र, स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

पंधराव्या वित्त आयोगाचे १५ कोटी रुपये महापालिका स्वहिस्साकरिता संबंधित योजनांवर वर्ग करण्याचा विषय महासभेपुढे होता. त्यावर विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला. वित्त आयोगातील अबंधनकारक निधी शिल्लक असताना त्यातून कामे घेण्याचा विषय न आणता केवळ बंधनकारक निधीचाच विषय महासभेपुढे का आणला? ठेकेदाराकडून सुपारी घेऊन हा विषय आणला आहे काय?, असा सवाल चव्हाण यांनी केला. प्रशासनावर आक्षेप घेत असताना भाजपच्या काही नगरसेवकांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आम्ही रखडलेल्या योजना पूर्ण करण्याची सुपारी घेतली असल्याचे संतोष पाटील म्हणाले. त्यातून वाद वाढला. अखेर बहूमताने या विषयाला मंजुरी देण्यात आली.

त्यानंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत २३.१७ कोटींची कामे निश्चित करण्याचा विषय चर्चेला आला. विरोधी पक्षनेते चव्हाण तसेच काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे, राजेश नाईक यांनी काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कोणत्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात येणार आहेत, याची माहिती नगरसेवकांना मिळाली पाहिजे. ही कामे सभागृहात वाचून दाखवावीत, अशी मागणी मेंढे यांनी केली. मात्र त्यावर चर्चा न होताच विषय मंजूर झाल्याचे सांगत महापौरांनी पुढचा विषय वाचण्याचे आदेश नगर सचिवांना दिले. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक संतप्त झाले आणि जागेवरून उठून महापौरांपुढील डायससमोर येत घोषणा देऊ लागले. सभागृह नेते संदीप आवटी यांनी सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगितले. सत्ताधारी नगरसेवकांनी मंजूर मंजूरऽऽच्या घोषणा दिल्या आहे, यानंतर महापौरांनी विषयपत्रिकेवरील तसेच ऐनवेळचे व एक (ज) अंतर्गत सर्व विषय मंजूर झाल्याचे सांगत सभागृहातून बाहेर पडले. उपमहापौर, आयुक्तही बाहेर पडले. त्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी 'पळाले, पळाले महापौर पळाले' , ' १५ कोटी घेऊन महापौर पळाले', '२३ कोटी घेऊन महापौर पळाले', 'भाजपचा धिक्कार असो' अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

काँग्रेसच्याबाजूने घोषणाबाजीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित कोळी यांनीही सहभाग घेतला. दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांकडून घोषणाबाजी सुरू असताना सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही सभागृहातून काढता पाय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT