सांगली : गणेशोत्सव पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. त्यासंदर्भात प्रभावी तयारी सुरू आहे, असे आयुक्त संजीता महापात्र यांनी सांगितले. यासंदर्भात गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयुक्त संजीता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस हार व फुले विक्रेते, मूर्तिकार, सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळांचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त महापात्र यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर पूर्णपणे टाळून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले. प्लास्टिक किंवा कृत्रिम फुलांऐवजी नैसर्गिक फुलांचा वापर करावा, थर्माकोल आणि सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेमार्फत उभारण्यात येणार्या कृत्रिम विसर्जन कुंडांमध्येच करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच निर्माल्य नदीत न टाकता निर्माल्य कुंडामध्ये जमा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नियमांचे उल्लंघन करून प्लास्टिक किंवा अन्य प्रतिबंधित साहित्याची विक्री करणार्या विक्रेत्यांवर नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. गणेशोत्सवाचे प्रभावी नियोजन आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर प्रथमच स्वतंत्र समन्वय गट स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आयुक्त संजीता महापात्र यांनी केली.