मसांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक ठिकाणी घोळ झाल्याचे समोर येत आहे. अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये समाविष्ट झाली असून अन्य प्रभागातील बरीच नावे नव्याने समाविष्ट झाल्याने अनेक इच्छुक माजी नगरसेवक संतापले आहेत. संबंधित मतदारानेच नव्हे, तर कोणीही हरकत घेतली, तर प्रशासनाने त्याची शहानिशा करून दुरुस्ती करावी, हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक इच्छुक माजी नगरसेवकांनी केली आहे.
प्रारूप मतदार यादीतील घोळावर माजी सभापती संतोष पाटील, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी नगरसेवक फिरोज पठाण, अभिजित भोसले, शेडजी मोहिते, विजय घाडगे, मनगू सरगर, योगेंद्र थोरात, रोहिणी पाटील, भारती दिगडे, रज्जाक नाईक, संजय कांबळे यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीच्या प्रारूप यादीतील चुका समोर आणल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये मिरज भागातील मतदारांची संख्या सुमारे 7 हजार होती. प्रारूप यादीत ही संख्या 10 हजारापर्यंत गेली आहे. या प्रभागात कुपवाडमधील मतदारांची संख्या 14 हजार होती, ती आता 10 हजार 500 झाली आहेत. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 8 मधून या मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 2 मध्ये आली आहेत. प्रारूप यादीत मोठा घोळ झाला आहे. यासंदर्भात महापालिकेकडे हरकत दाखल केली जाणार आहे, अशी माहिती शेडजी मोहिते यांनी दिली.
मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील चौगुले प्लॉट, अंगड गल्ली, नरवाडे गल्ली, ख्वाजा वसाहत, संघर्ष कॉलनी, श्रावणी पार्क, योगी नगर, जयहिंद नगर, प्रियदर्शिनी कॉलनी, जुना हरिपूर रस्ता या भागातील सुमारे 2 हजार 300 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6 व 7 मध्ये समाविष्ट झाली आहेत. अन्य प्रभागातील अनेक मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 20 मध्ये समाविष्ट झाली आहेत. संबंधित मतदारांनी हरकत दाखल करण्याची प्रतीक्षा न करता महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी दुरुस्त करावी, अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक 18 मधील सुमारे 1 हजार 500 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 15 व 17 मध्ये समाविष्ट झाली आहेत. प्रत्यक्ष संबंधित मतदाराने हरकत दाखल करण्याऐवजी कोणीही कोणाचीही हरकत घेतल्यास महापालिका प्रशासनाने त्याची खातरजमा करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील शाहू कॉलनी, एकता कॉलनी, दत्त मंदिर परिसरातील काही मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट झाली आहेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक 15 मधील रमामाता नगर, काळे प्लॉट, भोसले प्लॉट, पाकीजा मस्जिदच्या पाठीमागे गजानन कॉलनी, महावितरण उपकेंद्र या भागातील सुमारे बाराशे ते तेराशे मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 18 च्या प्रारूप यादीत समाविष्ट झाली आहेत. फौजदार गल्लीतील बागडी गल्ली, तसेच फौजदार गल्लीतील काही भाग हा प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट आहे. मात्र प्रारूप मतदार यादीत या भागातील सुमारे अडीचशे मतदार हे प्रभाग क्रमांक 16 च्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यासमोरील मद्रासी कॉलनीतील काही भाग हा प्रभाग क्रमांक 15 मध्ये असतानाही यातील सुमारे 50 मतदारांची नावे प्रारूप यादीत प्रभाग क्रमांक 16 मध्ये दिसत आहेत. जामवाडी, गवळी गल्ली, बुरुड गल्ली, जेठाभाईवाडी हा भाग प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट नाही. मात्र या भागातील सुमारे 700 ते 800 मतदार हे प्रभाग क्रमांक 15 च्या प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. महापालिका प्रशासनाने ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी माजी नगरसेवक फिरोज पठाण, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळवडे यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक 9 मधील जिजामाता कॉलनीतील अनेक मतदारांची नावे प्रारूप यादीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये समाविष्ट झाली आहेत. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 मध्येही काही मतदारांची नावे समाविष्ट झाली आहेत. त्याबाबत हरकत घेतली जाणार आहे, अशी माहिती माजी सभापती संतोष पाटील, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, मनगू सरगर यांनी दिली.
प्रभाग क्रमांक 11 मधील सुमारे 2 हजार 700 मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट झाली आहेत. सूर्यनगर, औद्योगिक वसाहत, चिंतामणीनगर झोपडपट्टी, कलानगर येथील काही मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक 12 मध्ये झाला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 15 मधील काही मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 16 मधील प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधील काही मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट झाली आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक उत्तम साखळकर यांनी दिली. जगदाळे प्लॉट संजयनगर, विश्रामबाग येथील जयहिंद कॉलनीतील काही मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 14 मध्ये समाविष्ट झाली आहेत. प्रारूप मतदार यादीतील 777 पानांवर केवळ एका-एकाच मतदाराचे नाव, फोटो, पत्ता आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीच्या झेरॉक्स खर्चावर जादा खर्च करावा लागत आहे, अशी तक्रार माजी गटनेत्या भारती दिगडे यांनी केली आहे.