सांगली : महापालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी रखडली आहे. गट-तट, अंतर्गत कलहामुळे काही जागांवर एकमत झालेले नाही. शनिवारी स्थानिक नेत्यांची बैठक झाली. उमेदवारी यादी अंतिम करण्यासाठी शिष्टमंडळ शनिवारी रात्री सांगलीहून मुंबईला रवाना झाले. रविवारी प्रथम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत शिष्टमंडळाची बैठक होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक होईल. रविवारी सायंकाळपर्यंत तोडगा निघेल व उमेदवारी यादी अंतिम होईल, असे सूत्रांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीत भाजपमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. जुना-नवा वाद चव्हाट्यावर आला आहे. आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, यासाठी नेतेमंडळी विशेष आग्रही राहिले. त्यामुळे उमेदवारी यादी अंतिम होता होईना झाली आहे. महापालिकेच्या 78 जागांसाठी भाजपकडे 529 इच्छुकांनी मुलाखत दिली आहे. शिवसेना, जनसुराज्य, आरपीआय या घटक पक्षांच्या जागा वाटपाचे घोडेही अडलेले आहे. जागा कमी आणि इच्छुकांचे उदंड पीक, अशी परिस्थिती आहे. पक्षांतर्गत विरोधकांची तिकिटे कापून त्यांना शह देण्याचे राजकारणही नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चितीस विलंब होत आहे.
शनिवारी भाजपची उमेदवारी यादी घोषित होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र उमेदवारी यादीवरून मतभेद कायम राहिले. काही जागांवरून एकमत झाले नाही. नाराजी पसरली. त्यामुळे उमेदवारी यादी रखडली. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांची शनिवारी सांगलीत बैठक झाली. नाराजी, वाद यावर चर्चा करून अंतिम उमेदवारी यादी तयार केल्याचे समजते. नेत्यांनी मात्र आपले फोन स्वीच ऑफ करत सर्वांना वेटिंगवर ठेवले आहे.
दरम्यान, आ. खाडे, आ. गाडगीळ, इनामदार व ढंग हे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्या भेटीला शनिवारी रात्री रवाना झाले. ही भेट मुंबईत होईल अथवा नेते पुण्याला असतील तर तिथे भेट होईल, असेही सांगण्यात आले. सांगलीतून गेलेले नेत्यांचे शिष्टमंडळ प्रथम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेईल. वादाच्या जागांवर तोडगा काढून उमेदवारी यादी तयार होईल. ही यादी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेली जाईल. त्याठिकाणी उमेदवारी यादी अंतिम होईल. रविवारी सायंकाळपर्यंत उमेदवारी यादी घोषित करता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
तीन ते चार प्रभागात वादाचे विषय
काही जागांचा अपवाद वगळता भाजपचे उमेदवार निश्चित झाले आहेत. सांगलीतील तीन ते चार प्रभाग व मिरजेत एका प्रभागात वादाचा विषय आहे. प्रभाग क्रमांक 9, 10, 11 आणि 12 मधील काही जागांबाबत एकमत होऊ शकले नाही. उमेदवारीसाठी वाद आणि आग्रह कायम आहे. त्यावर आता मुंबईत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री तोडगा काढणार आहेत.
एका इच्छुकाचा आमदारांच्या कार्यालयात ठिय्या
भाजपच्या शहर पूर्व मंडल उपाध्यक्षा प्रतिभा माने या प्रभाग क्रमांक 11 मधून ना.मा.प्र. महिला प्रवर्गातून भाजपकडून इच्छुक आहेत. मात्र उमेदवारीसाठी अन्य इच्छुकाचे नाव निश्चित झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे प्रतिभा माने व दीपक माने यांनी शनिवारी आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यावर, अद्याप उमेदवारी अंतिम झाली नसल्याचे काही नेत्यांनी माने यांना सांगितले. त्यानंतर माने यांनी आंदोलन मागे घेतले.