महापालिकेचा लाचखोर अधिकारी जाळ्यात 
सांगली

Sangli Bribery Case : महापालिकेचा लाचखोर अधिकारी जाळ्यात

ज्ञात उत्पन्नापेक्षा ​२६ लाख ६० हजार ७८७ रुपयांची जास्त संपत्ती उघड

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सव्वा लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेलेल्या सांगली-मिरज - कुपवाड शहर महानगरपालिकेतील निलंबित प्रभारी अग्निशमन अधिकारी विजय आनंदराव पवार (वय ५१, मूळ रा. चिकुर्डे, सध्या रा. सांगलीवाडी) याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवार याने आपल्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा तब्बल २६ लाख ६० हजार ७८७ रुपये अधिक बेहिशेबी मालमत्ता धारण केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २७ जून २०२३ रोजी टिंबर एरियातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले होते. महापालिका क्षेत्रातील एका कंपनीला अग्निरोधक यंत्रणेचा (फायरफायटिंग) अंतिम ना-हरकत दाखला देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. या कारवाईनंतर महापालिका प्रशासनाने त्याला सेवेतून निलंबित केले होते.

या तपासादरम्यान विजय पवार याच्याकडे त्याच्या वैध उत्पन्नापेक्षा २६ लाख ६० हजार ७८७ रुपयांची मालमत्ता जास्त असल्याचे उघडकीस आले. ही संपत्ती त्याच्या मूळ उत्पन्नाच्या तब्बल ३१.६४ टक्के अधिक आहे. या अतिरिक्त मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवार याला स्पष्टीकरण देण्याची संधी दिली होती, मात्र जमा आणि खर्चाचा समाधानकारक हिशेब तो देऊ शकला नाही.

अखेर अप्रामाणिक मार्गाने आणि भ्रष्टाचारातून ही संपत्ती मिळवल्याचे स्पष्ट झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT