सांगली : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी काँग्रेसचा कोटा दोन इतकाच आहे, पण तब्बल 20 हून अधिक इच्छुकांनी अर्ज पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडे दिले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, पण त्याचबरोबर पराभूत झालेलेही काही पुन्हा मैदानात उतरलेत.
महापालिकेत आता स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 8 झाली आहे. भाजपमधून 4, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीतून 2 जणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. महापालिका निवडणुकीत नेत्यांनी अनेकांना स्वीकृत नगरसेवकपदाचे आश्वासन देऊन थंड केले होते. त्यापैकी कोणाकोणाला संधी मिळणार, हे आता औत्सुक्याचे ठरत आहे. सर्वच पक्षांत स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, काँग्रेसकडेही इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आतापर्यंत शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडे 20 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडेही काही इच्छुकांनी परस्पर अर्ज दिलेले आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वीसहून अधिक आहे. दरम्यान, शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्वीकृत नगरसेवकपदासाठी आलेले अर्ज नेत्यांकडे सादर केले जाणार आहेत. कोणाला संधी द्यायची, किती वर्षे द्यायचे हे नेते निश्चित करतील.