अंदाजपत्रकावरून पदाधिकारी-प्रशासन संघर्षाची ठिणगी Pudhari Photo
सांगली

Sangli News : अंदाजपत्रकावरून पदाधिकारी-प्रशासन संघर्षाची ठिणगी

महासभेकडे सादर करण्याबाबत महापौरांचे पत्र; प्रशासनाकडून अधिनियमांचा अभ्यास सुरू

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेत प्रशासकराज संपून पदाधिकारी, लोकनियुक्त नगरसेवकांचा कारभार सुरू झाला आहे. मात्र कारभाराच्या सुरुवातीलाच अंदाजपत्रकावरुन पदाधिकारी-प्रशासन संघर्षाची ठिणगी पडली आहे. दि. 31 मार्च जवळ आल्याने अंदाजपत्रक महासभेकडे सादर करा, असे पत्र महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे धाडले आहे, तर प्रशासनाने त्याबद्दल अधिनियमांचा अभ्यास सुरू केला आहे.

प्रशासनाकडून अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाते. स्थायी समिती सभापतींकडून ते महासभेत मांडले जाते. त्यामुळे थेट महासभेकडे अंदाजपत्रक सादर करता येते का, याचा अभ्यास प्रशासनाने सुरू केला आहे. महापालिकेत अडीच वर्षे प्रशासकराज होते. सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रशासक राज संपले आहे. आता लोकनियुक्त नगरसेवक आणि त्यांनी निवडलेले पदाधिकारी यांचा कारभार सुरू झाला आहे. पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली आहे. माहिती घेणे, निर्देश देणे सुरू आहे. दरम्यान ‌‘मार्च एन्ड‌’ आल्याने पदाधिकारी, सदस्यांना आता अंदाजपत्रकाचे वेध लागले आहेत.

प्रशासनाकडून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. आयुक्तांनी सर्व विभागांच्या बैठका घेतल्या आहेत. प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त तयार करतात. हे प्रशासकीय अंदाजपत्रक प्रथम स्थायी समितीकडे सादर होते. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर ते महासभेपुढे सादर होते. पण सध्या स्थायी समिती अस्तित्वात नाही. स्थायी समिती सदस्यांची निवड झालेली नाही. स्थायी समिती सभापतींची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर करण्यावरून प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासकीय अंदाजपत्रक महासभेकडे सादर करावे, असे पत्र महापौर सूर्यवंशी यांनी आयुक्त गांधी यांना पाठवले आहे. अधिनियमातील काही तरतुदींचा उल्लेखही पत्रात केला आहे. मात्र प्रशासनाने त्यावर आता अधिनियमांचा अभ्यास सुरू केला आहे. अंदाजपत्रकाच्या निमित्ताने पदाधिकारी-प्रशासन संघर्षांची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याची चर्चा शुक्रवारी महापालिका वर्तुळात सुरू होती.

स्थायी समिती सदस्य निवड, प्रभाग समित्या, विशेष समित्या निवडीसाठी 2 मार्चला महासभा

स्थायी समितीतील 16 सदस्यांची नेमणूक तसेच प्रभाग समित्या, विशेष समित्या स्थापन करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा (महासभा) दि. 2 मार्चरोजी होणार आहे. यासंदर्भात सचिव अशोक माणकापुरे यांनी महापालिका सभेची नोटीस काढली आहे. महानगरपालिका स्थायी समिती सदस्यांची संख्या 16 आहे. पक्षनिहाय संख्याबळानुसार स्थायी समितीत भाजपच्या 8, काँग्रेसच्या 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या 3 व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नगरसेवकाला संधी मिळणार आहे. त्यासाठी या पक्षातील नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. स्थायी सदस्य निवडीसाठी महासभा केव्हा होणार याकडे लक्ष लागले होते. शुक्रवारी महापालिका सचिवांनी महासभेची नोटीस काढली आहे.

स्थायी समितीतील 16 सदस्यांची नेमणूक करणे, चार प्रभाग समित्यांची स्थापना करणे, विशेष समित्यांतर्गत समाजकल्याण समिती व महिला व बालकल्याण समिती स्थापन करणे हे विषय दि. 2 मार्चच्या महासभेपुढे आहेत. हनुमाननगर येथे नवीन नाट्यगृह बांधकामाच्या 29.97 कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा मागवण्यास व येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याचा विषयही या महासभेपुढे आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT