सांगली : महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांच्या गटनेतेपदी संदीप आवटी (मिरज) यांची निवड करण्यात आली आहे. संदीप आवटी यांचे बंधू निरंजन आवटी हे महापौरपदाच्या शर्यतीत होते, मात्र संदीप आवटी यांची गटनेतेपदी निवड झाल्याने निरंजन आवटी हे महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. महापौरपद आता सांगलीला मिळणार, हे स्पष्ट झाले आहे. धीरज सूर्यवंशी, अतुल माने, रोहिणी पाटील व ॲड. स्वाती शिंदे हे महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. महापौरपदासाठी त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस नवनिर्वाचित नगरसेवक तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, नीता केळकर, पृथ्वीराज पवार, भाजप जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वाती खाडे, सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी, पांडुरंग कोरे, विशाल पवार, विश्वजित पाटील, युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे उपस्थित होते.
महापालिकेतील भाजपच्या गटनेते पदासाठी कोअर कमिटीच्या सदस्यांकडून बंद पाकिटातून नावे घेण्यात आली होती. यात ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नवलाई, संदीप आवटी, संतोष पाटील यांच्यासह काही नगरसेवकांची नावे होती. त्यावर चर्चा होऊन मिरजेतील प्रभाग 03-ड मधून निवडून आलेले संदीप आवटी यांची गटनेतापदी बिनविरोध निवड करण्यात आली. गटनेतेपदासाठी संदीप आवटी यांची निवड ही या गटासाठी तशी धक्कादायक होती. कारण संदीप यांचे लहान भाऊ निरंजन आवटी हे महापौरपदासाठी इच्छुक होते. पण गटनेतेपदी संदीप यांची निवड झाल्याने आता महापौरपदाच्या शर्यतीतून निरंजन हे बाजूला पडले, हे स्पष्ट झाले आहे.