सांगली : नूतन महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदूम यांचा आयुक्त सत्यम गांधी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सत्कार केला.  
सांगली

Sangli mayor election : महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी

राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर; गुलालाची उधळण

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गजानन मगदूम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर महापौर सूर्यवंशी समर्थक व उपमहापौर मगदूम समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी मंगळवारी नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष महासभा झाली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी काम पाहिले. यावेळी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव अशोक माणकापुरे उपस्थित होते.

पीठासीन अधिकारी विशाल नरवाडे यांनी सुरुवातीला महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया राबवली. या पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचे दोन अर्ज होते. ते छाननीत वैध ठरले. महापौर पदासाठी विरोधी उमेदवारी अर्ज नसल्याने सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे दोन अर्ज होते. छाननीत ते वैध ठरले. उपमहापौर पदासाठीही विरोधी उमेदवारी अर्ज नव्हते. त्यामुळे मगदूम यांची उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नूतन महापौर, उपमहापौरांचे विशाल नरवाडे यांच्यासह महापालिका प्रशासनाच्यातीने आयुक्त सत्यम गांधी यांनी अभिनंदन केले. यानंतर भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक, महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशी, मगदूम यांचा सत्कार केला. भाजपचे नेते माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, भाजपचे नेते सुरेश आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, भाजपचे गटनेते संदीप आवटी यांच्यासह मान्यवरांनी नूतन महापौर, उपमहापौर यांचा सत्कार केला.

तीनही शहरांचा समतोल विकास करू : महापौर सूर्यवंशी

नूतन महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच भाजप शहर जिल्हा कोअर कमिटीतील सर्व नेते, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला महापौर पदाची संधी दिली. सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरांचा समतोल व सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राहील. महापालिकेतील सर्व 78 नगरसेवकांना सोबत घेऊन महापालिका क्षेत्राचा विकास करणार आहे. केंद्र व राज्य शासनाचा निधी आणून कामे, प्रकल्प मार्गी लावू. प्रशासनाला बरोबर घेऊन शहराचा विकास करू. काळी खण सुशोभीकरणाबाबत माहिती घेतली जाईल.

अजितदादांची आठवण; उपमहापौरांना शब्द फुटेनात

शेतकरी कुटुंबातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे उपमहापौर पदाची संधी मिळाली, असे सांगत असताना उपमहापौर गजानन मगदूम भावूक झाले. उपमहापौर दालनात गेल्यानंतर ते म्हणाले, खरे तर मी महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पण अगदी ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मला फोन आला. ‌‘राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा ए.बी. फॉर्म घेऊन अर्ज भरा‌’, असे ते म्हणाले. त्यानुसार अर्ज भरला. निवडून आल्यानंतर त्यांनी मला भेटायला बोलावले होते. पण तत्पूर्वीच त्यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांना भेटण्याची संधी मिळालीच नाही.

विकासासाठी महापालिकेत सर्वांना सोबत घेऊ ः इनामदार

महापालिकेत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने सत्ता स्थापन केली आहे. शहराला स्वच्छ पाणी, आरोग्य व स्वच्छताविषयक सेवा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठी काम होईल. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडूनही निधी आणू. शहराच्या विकासासाठी महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT