Sangli Municipal Corporation: राष्ट्रवादीचे बागवान, काँग्रेसचे नाईक भिडले Pudhari
सांगली

Sangli Municipal Corporation: राष्ट्रवादीचे बागवान, काँग्रेसचे नाईक भिडले

महासभेत एकमेकांच्या अंगावर धावून गेले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईवरून काँग्रेसच्या नगरसेविकांनी रिकाम्या घागरी घेत महासभेत महापौरांना घेरण्याचा प्रयत्न केला. महापौरांसमोरील डायससमोर येत घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी टिपणी केल्याने काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक राजेश नाईक यांनी त्यांना जाब विचारला. त्यावरून बागवान-नाईक यांच्यात वाद पेटला. एकेरी भाषा वापरत दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अखेर महापौर धीरज सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते व नगरसेवकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

महापालिकेत बुधवारी महासभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर धीरज सूर्यवंशी होते. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त सत्यम गांधी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. महासभेच्या प्रारंभीच काँग्रेसच्या नगरसेविकांनी रिकाम्या घागरी महापौर सूर्यवंशी यांच्यासमोर आणून ठेवल्या. शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, यावर काय उपाययोजना करणार का नाही? असा प्रश्न केला व घोषणाबाजी केली. महापौर सूर्यवंशी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत, पाणीप्रश्नावर विशेष सभा घेणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर नगरसेविका आपल्या जागी परत येत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी घागर आंदोलनाबाबत टिपणी केली. ती काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक यांना खटकली.

पाणीप्रश्नाची ही चेष्टा आहे, असे त्यांनी सुनावले. त्यावर बागवान यांनी नाईक यांना एकेरी भाषा वापरत खाली बस, असे म्हटले. त्यातून वाद पेटला. दोघेही एकेरीवर आले. खाली बसायला तू कोण सांगणार, असे म्हणत नाईक हे बागवान यांच्या अंगावर धावून गेले. दोघांत जोरदार वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बागवान यांनी नाईक यांच्यावर माईक उगारला. वाद विकोपाला गेल्याने महापौर सूर्यवंशी यांनी या दोन्ही सदस्यांना जागेवर बसण्याचे निर्देश दिले. त्यानंतर वाद थांबला.

सांगलीवाडी येथे हिंदू स्मशानभूमीसाठी 22 लाख रुपये मंजूर आहेत. ही रक्कम एका नेत्याच्या घरासमोरील रस्त्याची डागडुजी करण्यासाठी खर्च केली जाणार आहे, त्यास विरोध असल्याचे अभिजित कोळी यांनी सांगितले. शासन निर्णयाच्या अधीन राहून महापालिकेच्या समाजकल्याण समितीचे सदस्य म्हणून जगन्नाथ ठोकळे व अश्विनी कोळी यांची निवड करण्यास महासभेत मान्यता देण्यात आली.

डार्क स्पॉटवर सीसीटीव्ही

महापालिका क्षेत्रातील डॉर्क स्पॉटवर सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व्हिलन्स यंत्रणा बसवण्यासाठी 1.50 कोटी रुपयांचा निधी पोलिस प्रशासनाकडे वर्ग करण्याचा ठराव महासभेत झाला. दरम्यान, यापूर्वी 2 कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही बसवलेल्या ठिकाणांची यादी द्या, अशी मागणी विष्णू माने यांनी केली. या यादीतील एकाही ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT