सांगली : स्वीकृत नगरसेवकाच्या पदासाठी कायद्यातील अटींची पूर्तता केली नसल्याने सोळा इच्छुकांचे प्रस्ताव अपात्र झाले. यात भाजपचे 5, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे दोन, तर पाच सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. एकूण 73 अर्जांपैकी 57 जणांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत.
महापालिकेच्या आठ स्वीकृत नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या प्रस्तावांची तपासणी गुरुवारी आयुक्त संजिता महापात्रा यांनी केली. स्वीकृतसाठी गटनेत्यांकडून प्रस्ताव मागवले होते. भाजपच्या चार जागांसाठी 29 जणांचे, काँग्रेसच्या 2 जागांसाठी 22, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या 2 जागांसाठी 17 इच्छुकांचे प्रस्ताव नगरसचिवांकडे गटनेत्यांनी पाठविले होते, तर सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे, रवींद्र वळवडे यांच्यासह पाचजणांनी प्रस्ताव दिले होते. या प्रस्तावांची छाननी गुरुवारी पूर्ण झाली. त्यानंतर नगरसचिव सहदेव कावडे यांनी सर्व प्रस्ताव आयुक्तांकडे तपासणीसाठी दिले होते. यामध्ये सोळाजणांचे प्रस्ताव अपात्र ठरले. यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक विशाल कलगुटगी, ताजुद्दीन शेख, सूरज कांबळे, नितीन मिरजकर, भाजपचे राजकुमार चुघ, स्मिता पवार, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, उज्ज्वला चौधरी; तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सूरज शिंगे व शिशिर जाधव, तर सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे, रवींद्र वळवडे यांच्यासह पाच जणांचे प्रस्ताव देखील अपात्र ठरले. छाननीनंतर भाजपचे 24, काँग्रेसचे 18 व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे 15 प्रस्ताव पात्र ठरले आहेत. यापैकी आठजणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे.
महापौर करतील निवड जाहीर
भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेते शुक्रवारी सकाळी दहा वाजता गटनेत्यांकडे स्वीकृत नगरसेवक पदांची नावे देणार आहेत. त्यानंतर महासभेत महापौर धीरज सूर्यवंशी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर करणार आहेत.