सांगली

Dhiraj Suryavanshi : महापालिका 100 कोटींचे कर्जरोखे उभारणार

महापौर सूर्यवंशी : अर्थसंकल्प 1616 कोटींवर; 551 कोटींची वाढ : घरपट्टी, पाणीपट्टी आगाऊ भरणाऱ्यांना भरीव सूट

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सोमवारी महानगरपालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प अंतिम केला. हा अर्थसंकल्प 1616.62 कोटी जमा आणि 1580 कोटी रुपये खर्चाचा आहे. महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच म्युनिसिपल बॉण्डच्या (कर्जरोखे) माध्यमातून 100 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे.

केंद्र, राज्य शासनाकडून 200 कोटी रुपये शहरी आव्हान निधी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. घरपट्टी, पाणीपट्टी आगावू भरणाऱ्यांना सामान्य करात 50 ते 60 टक्के भरीव सूट, शिव-शंभू सृष्टी यासह विविध योजनांचा वर्षाव या अर्थसंकल्पात केला आहे. हा अर्थसंकल्प शहराच्या उज्ज्वल भविष्याचा रोडमॅप असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. यावेळी उपमहापौर गजानन मगदूम उपस्थित होते.

महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीला 1065 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी काही सूचना व नवीन योजनांसह 1173 कोटींचा अर्थसंकल्प मार्च 2026 च्या महासभेत सादर केला होता. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांसह अर्थसंकल्प अंतिम करण्याचे अधिकार महासभेने महापौर धीरज सूर्यवंशी यांना दिले होते. सूर्यवंशी यांनी 1616 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अंतिम केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प ते महापौरांनी अंतिम केलेला अर्थसंकल्प पाहता, एकूण 551 कोटींची वाढ झाली आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात 443 कोटींची भर पडली आहे.

महापौर सूर्यवंशी म्हणाले, हा अर्थसंकल्प विकास, प्रगती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाचा संकल्प आहे. म्युनिसिपल कर्जरोख्यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये नागरिक, संस्था, गुंतवणूकदारांकडून उभारले जाणार आहेत. ही रक्कम संबंधितांना ठराविक वर्षांनंतर मुद्दल व व्याज स्वरूपात परत केली जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नवाढीचे विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

केंद्र, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 200 कोटींचा विशेष निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. प्रभाग समिती सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात प्रथमच तरतूद केली आहे. नगरसेवक, पदाधिकारी विकास निधी तसेच आरोग्य, स्वच्छता, रुग्णालये, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, उद्यान, पाणी पुरवठा, ड्रेनेज आदी बाबींसाठी आवश्यक असलेला विकास निधी निश्चित केला आहे. महोत्सव, दिनविशेष, सांस्कृतिक पुरस्कार, महापुरुषांची जयंती यासाठी निधीची तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी...

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम (सांगली व मिरज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (सांगली व कुपवाड) : 16.25 कोटी, महिला व बालकल्याण निधी : 10 कोटी, दिव्यांगांना सोयी-सुविधांसाठी विशेष निधी, महापालिका शाळांसाठी 5.10 कोटी, पूरबाधित क्षेत्र व पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या निवारणासाठी निधी, घर, परिसर स्वच्छतेसंदर्भात एक घर, श्रेष्ठ लोक, निष्ठावंत परिसर/कॉलनी योजना, प्रभाग समिती क्र. 2 च्या कार्यक्षेत्रामध्ये पर्यटन व सायन्स पार्क : 1 कोटी, सांगलीत शाळा क्रमांक 6 येथे आधुनिक जलतरण तलाव : 50 लाख, बाळासाहेब ठाकरे अभियानअंतर्गत शाळांमध्ये सुविधा : 5 कोटी, मिरज हायस्कूल मिरज परिसर विकसीत करणे : 2 कोटी, सांगली व मिरज शहरामध्ये अत्याधुनिक वाचनालय : 20 लाख, पत्रकार भवन, वकील भवन : प्रत्येकी 25 लाख, महापालिकेचा पेट्रोल पंप उभारणे : 3 कोटी, स्मशानभूमी विकसीत करणे : 2.50 कोटी, तृतीयपंथीयांकरिता स्मशानभूमी विकसित करणे : 50 लाख, डास प्रतिबंधक उपाययोजना : 3 कोटी रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT