Sangli Water Supply : महापालिका क्षेत्रात आजपासून १० टक्के पाणी कपात file photo
सांगली

Sangli Water Supply : महापालिका क्षेत्रात आजपासून १० टक्के पाणी कपात

सांगली, कुपवाडमध्ये रोज काही टाक्यांचा पाणीपुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार ही कार्यवाही सुरू होणार आहे. सांगली आणि कुपवाड शहरांत टप्प्या-टप्प्याने पाण्याच्या टाक्यांचा पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे; तर मिरज शहरातील सर्व १७ टाक्यांचा पाणीपुरवठा दर मंगळवारी बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पर्जन्यमानातील अनिश्चितता व उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने सर्वच महापालिकांना १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कपातीचे नियोजन केले आहे. त्यानुसार कुपवाड झोनमधील १२ टाक्यांपैकी दररोज एक किंवा दोन टाक्यांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कुपवाड शहरात टप्प्या-टप्प्याने पाणी कपात केली जाईल.

सांगली गावठाण परिसरातील हिराबाग झोनमध्ये आठ टाक्या आहेत. त्यापैकी दररोज एका टाकीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच माळबंगला झोनमधील नऊ टाक्यांपैकी दररोज एक किंवा दोन टाक्यांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

रोज १.३० कोटी लिटर पाणी कपात

सांगली आणि कुपवाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ९० एमएलडी (मिलियन लिटर्स पर डे) आणि मिरज शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ४० एमएलडी इतका पाणी उपसा कृष्णा नदीतून केला जातो. सांगली, कुपवाड आणि मिरज शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण १३० एमएलडी म्हणजे दररोज १३ कोटी लिटर पाणी नदीतून उपसा केले जाते. आता शासन निर्देशानुसार १० टक्के पाणी कपात करावी लागणार आहे. त्यामुळे दररोज १.३० कोटी लिटर पाणी उपसा कमी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT