सांगली : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या सांगली विभागामार्फत जिल्ह्यातील विविध आगारांंतून तब्बल ३९७ जादा बसेस सोडल्या. या माध्यमातून एसटीला ८५ लाख २७ हजार ५७६ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात १ लाख ६२ हजार रुपयांची वाढ झाली असली, तरी प्रवासी संख्येत मात्र १४ हजार ४०० ने घट झाली आहे. खासगी वाहनांची संख्या वाढल्याने ही घट झाली असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर्षी ६३ हजार ५३२ भाविकांनी एसटीने प्रवास केला.
आषाढी एकादशीसाठी सुरुवातीला २५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, भाविकांची गर्दी लक्षात घेता जिल्ह्यातील दहाही आगारांतून २० ते २९ जुलैदरम्यान प्रत्यक्षात ३९७ जादा बसेसच्या फेऱ्या चालवण्यात आल्या. या काळात ६३ हजार ५३२ भाविकांनी प्रवास केला, यातून एसटीला ८५ लाख २७ हजार ५७६ रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती विभाग नियंत्रक सुकन्या साठे व विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली.
यंदाच्या यात्रेसाठी २५७ बसेसचा वापर करण्यात आला, तर गतवर्षी २३५ बसेस वापरण्यात आल्या होत्या. गतवर्षी ८३ लाख ६४ हजार ६१९ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर ७७ हजार ९३२ भाविकांनी प्रवास केला होता. यंदा प्रवासी संख्या घटून ती ६३ हजार ५३२ वर आली असली, तरी उत्पन्नात मात्र वाढ झाली आहे. या आषाढी यात्रेचे नियोजन विभागीय वाहतूक अधीक्षक सतीश पाटील, यात्रा प्रमुख रोहित गुरव, प्रवीण डोंगरे, सहवाहतूक निरीक्षक विपुल शिंदे, अक्षय पाटील, शैलेश मोहिते, मनोज कांबळे, अनिकेत घोरपडे आणि मुनीर आंबेकरी आदींनी केले.