सांगली : दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मोठा फायदा झाला आहे. यंदा प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एसटीच्या तिजोरीत विक्रमी भर पडली असून, भाऊबीजेच्या दिवशी सांगली विभागाला १ कोटी ८८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बुधवारी एकाच दिवसात २ लाख ५ हजार ४८० जणांनी एसटीने प्रवास केला असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक उत्पन्न मिळाले आहे.
सांगली विभागामार्फत भाऊबीजेसाठी प्रवाशांच्या सोयीकरिता ८० जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या दिवशी एकूण ७२६ बसचा वापर करण्यात आला असून, या बसनी २ लाख ९९ हजार ८२६ किलोमीटर इतका प्रवास केला. प्रवास केलेल्या एकूण २ लाख ५ हजार ४८० प्रवाशांमध्ये १ लाख ७ हजार ४२० महिला प्रवाशांचा समावेश आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा एसटीचा १५ हजार ८६६ किलोमीटर अधिक प्रवास झाला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये खासगी ट्रॅव्हल्सच्या अव्वाच्या सव्वा तिकीट दरांमुळे प्रवाशांनी सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी एसटीलाच पहिली पसंती दिली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने जिल्ह्यातील दहाही आगारांमधून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, सोलापूर आणि कोल्हापूरसाठी जादा बस सोडल्या होत्या. या जादा फेऱ्यांना प्रवाशांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सणाच्या काळातही सुट्टी न घेता चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिल्यामुळेच हे यश शक्य झाल्याची माहिती विभाग नियंत्रक सुकन्या साठे, वाहतूक अधिकारी संतोष बोगरे आणि अधीक्षक प्रवीण डोंगरे यांनी दिली.