सांगली : सांगलीतील तीन गिर्यारोहकांनी लेह-लडाखमधील तब्बल ६,२५० मीटर उंचीचे कांग यातसे-२ हे हिमशिखर सर करून तिरंगा अभिमानाने फडकावला. स्वप्निल कुंभारकर, ऋषिकेश गोखले आणि मनोज देसाई या घनिष्ट मित्रांनी ही साहसी कामगिरी केली. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी त्यांनी शिखरमाथा गाठला.
आपापल्या व्यवसायाचे आणि कामाचे नियमित वेळापत्रक सांभाळत या तिघांनी साहसी खेळ, क्रॉसफिट गेम्स आणि गिर्यारोहणाची आवड जोपासली आहे. उत्तुंग ध्येय समोर ठेवून गेल्या वर्षभरापासून त्यांनी या मोहिमेसाठी कठोर शारीरिक आणि मानसिक तयारी केली होती. तिघांच्याही पाठीशी सह्याद्री, हिमालय, तसेच नेपाळमधील अवघड गिर्यारोहणाचा अनुभव असल्याने या मोहिमेसाठी त्यांना त्याचा मोठा फायदा झाला.
सहाहजारी हिमशिखर सर करणे हे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. उंची वाढत गेल्यानंतर वातावरणातील तीव्र बदल, बोचरे वारे आणि ऑक्सिजनची कमतरता यांचा सामना गिर्यारोहकांना करावा लागतो. कांग यातसे-२च्या उंचीवर समुद्रसपाटीच्या तुलनेत ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे ६५ टक्केच राहते. विरळ हवेमुळे होणाऱ्या शारीरिक त्रासावर मात करत या तिघांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी विशेष कौतुकास्पद ठरली.
लेहमधील 'चो एक्सपिडिशन' या गिरिप्रेमी संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम पार पडली. संस्थेचे प्रमुख शेर्पा स्टांझिन नोर्बो तसेच मार्गदर्शक उगिअन, स्टाफेल आणि जिग्मेट यांच्या साथीने संपूर्ण टीमने शिखर सर केले. शिखर चढाईला रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुरुवात करण्यात आली. तब्बल साडेसात तासांच्या अथक् चढाईनंतर सकाळी ६.४० वाजता कांग यातसे-२च्या शिखरावर तिरंगा फडकविण्यात आला. त्यानंतर बेसकॅम्पकडे परतीचा खडतर प्रवास सुरू झाला आणि दुपारी ११ वाजता टीम बेसकॅम्पवर पोहोचली. चढाई, शिखर सर करणे आणि परतीचा प्रवास अशा एकूण सुमारे १३ तासांच्या या आव्हानात्मक टप्प्यात तिघांच्याही तयारीचा कस लागला. या मोहिमेचा एकूण कालावधी १३ दिवसांचा होता. लेह, सारा, उमलुंग, ठोकटुत्से, बेसकॅम्प, कांग यातसे-२ समिट, कोंगमारूला पास, चोकडो आणि पुन्हा लेह असा या मोहिमेचा प्रवास झाला.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ६,२५० मीटर उंचीवर तिरंगा फडकवून सांगलीचे नाव हिमालयाच्या शिखरावर नेणाऱ्या स्वप्निल कुंभारकर, ऋषिकेश गोखले आणि मनोज देसाई या साहसवीरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.