विटा : विटा -वेजेगाव रस्त्यावर वलखड गावच्या हद्दीत कुत्र्याला वाचवायच्या प्रयत्नात दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. आनंदराव बळवंत चव्हाण (वय 62, रा. पानमळेवाडी, ता. तासगाव) असे मृताचे नाव आहे. अपघात बुधवारी रात्री घडला. याबाबत बाळासाहेब दत्तात्रय भोसले यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.
पानमळेवाडी येथील बाळासाहेब भोसले आणि आनंदराव चव्हाण हे दोघे बुधवारी सायंकाळी पानमळेवाडी येथून दुचाकीवरून (एमएच 10, एएस 5197) वलखड येथे मित्राच्या घरी जेवणासाठी गेले होते. तेथून परतत असताना आनंदराव चव्हाण दुचाकी चालवत होते आणि बाळासाहेब भोसले मागे बसले होते. यावेळी पाऊस सुरू होता. वलखड हद्दीत देवकर मळ्याजवळ गावठाण भेंडवडे फाट्यावरील पिकअप शेडजवळ अचानक आडवे आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरून थेट रस्त्याखालच्या नाल्यात गेली. दोघेही खाली पडले. यात आनंदराव चव्हाण यांच्या डोक्यास जोरात मार लागला आणि ते गंभीर जखमी झाले. बाळासाहेब भोसले यांनाही मार लागला. त्यांच्या डोक्यास व डाव्या पायाच्या गुडघ्यास किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही आपत्कालीन रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आनंदराव चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले.