जत : विजापूर - गुहागर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने यात एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. आहे. विजय नारायण कलगुंडे (वय 22, रा. खैराव, ता. जत) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर राहुल शिवाजी कलगुंडे (वय 23, रा. खैराव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.
नारायण जेट्याप्पा कलगुंडे यांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात फिर्याद दिली. या अपघातातील राहुल शिवाजी कलगुंडे यास सांगली येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
विजय व राहुल दोघे मोटरसायकल (एमएच 11, डीके 2877) वरून नागज राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. दरम्यान विनानंबर लाल रंगाच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवून समोरून येणार्या मोटरसायकलला धडक दिली. मोटरसायकलवरील विजय कलगुंडेचा मृत्यू झाला, तर राहुल शिवाजी कलगुंडे गंभीर जखमी झाला आहे.