तासगाव : येथील कासार गल्लीतील मयूर रामचंद्र माळी (वय 30) या तरुणाच्या खूनप्रकरणी तासगाव पोलिसांनी त्याची आई संगीता, बहीण काजल या दोघींना अटक केली आहे. संशयित दोघींना सोमवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.
मयूर याचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. मयूर याला जेवणातून गुंगीचे औषध देऊन, तो बेशुद्ध असताना त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहावर कपडे टाकून जाळण्याचा व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मयूर याने आत्महत्या केली असल्याचा बनाव मारेकरी आई आणि बहिणीने केला होता.
मृतदेहावर कपडे टाकून तो पेटविला असताना त्यांच्या घरातून धुराचे लोळ येत होते. हे शेजारी असणार्या कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी तासगाव पालिकेची अग्निशमन गाडी बोलावली. अग्निशमन गाडीने घरातील आग आटोक्यात आणल्यानंतर त्या ठिकाणी मयूरचा मृतदेह भाजलेल्या अवस्थेत दिसून आला. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी बारकाईने तपास केला असता मयूरच्या डोक्याला मोठी दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाल्याचे व घटनास्थळी मोठा दगड पडल्याचे दिसून आल्याने मयूरचा खून झाला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
पोलिसांनी यावेळी मयूरची आई संगीता व बहीण काजल यांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या दोघींनी मयूरच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले. दरम्यान, संपूर्ण तासगाव शहरात काल दिवसभर या खुनाचीच चर्चा सुरू होती. खून का झाला असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.