कवठेमहांकाळ : देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील लोहार मळा परिसरात विहिरीत पडून विवाहितेसह तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. प्रीती मनोहर राठोड (वय २४) आणि मुलगा श्रीहण मनोहर राठोड (वय २ वर्षे, दोघे रा. विजापूर, कर्नाटक) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे. याबाबत माहिती अशी की, शनिवारी हे दोघेही बेपत्ता झाल्यानंतर शोधाशोध सुरू होती. अखेर दोघांचेही मृतदेह रविवारी विहिरीत आढळून आले.
ऊस तोडणीच्या कामासाठी राठोड कुटुंब हे देशिंग परिसरात आले होते. शनिवारी प्रीती आणि त्यांचा मुलगा श्रीहण अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी परिसरात शोध सुरू केला. अनेक ठिकाणी शोध घेत असताना देशिंग येथील लोहार मळा परिसरात प्रीती यांची ओढणी एका विहिरीलगत आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विहिरीजवळ चप्पल आढळल्याने नातेवाईकांचा संशय बळावला.
नातेवाईकांनी विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र विहीर खोल असल्याने त्यांना यश आले नाही. त्यामुळे सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आले. पथकाने विहिरीत शोधमोहीम राबविली. यावेळी प्रथम प्रीती राठोड व नंतर चिमुकल्या श्रीहण याचाही मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात रेस्क्यू फोर्सला यश आले.
या घटनेने देशिंग परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.