Sangli Fire Incident: सांगलीत आगीत मोबाईल शॉपी खाक Pudhari Photo
सांगली

Sangli Fire Incident: सांगलीत आगीत मोबाईल शॉपी खाक

जीवित हानी टळली; पाचव्या मजल्यावरील 5 व्यक्तींची सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरातील मध्यवस्तीतील आझाद चौकातील अण्णाज्‌‍ नवतरंग मोबाईल शॉपीला गुरुवारी सकाळी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीबरोबर धुराचे लोट उठले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे जीवित हानी टळली. आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील लॉजमधील 5 व्यक्तींची सुखरूप सुटका केली. ही आग इन्व्हर्टर शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येथील काँग्रेस कमिटी ते स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आझाद चौकात शिव मेरिडियन हे कमर्शिअल कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये अनेक व्यावसायिक दुकाने आहेत. यामधील अण्णाज्‌‍ नवतरंग शॉपीला गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. येथे कर्तव्यास असलेले रखवालदार नजीरहुसेन मुलाणी यांना या दुकानातून धूर येत असल्याचे, तसेच आग लागल्याचे निदर्शनास आले.

मुलाणी यांनी तत्काळ आर. के. सर्व्हिसेसचे रवींद्र केंपवाडे यांना ही माहिती दिली. केंपवाडे यांनी तत्काळ महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाची दोन वाहने घटनास्थळी पाठवली. मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, फायरमन धीरज पावणे, प्रसाद माने, अण्णासाहेब देशमुख, ओंकार ऐतवडे, चालक उमेश सरवदे, देविदास मानकरी, विजय कांबळे यांनी प्रयत्नांची शर्थ करत आग आटोक्यात आणली.

या आगीत दुकानातील साहित्य व मालाचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी दिली. अग्निशमन दलाने वेळेवर दाखवलेली तत्परता आणि बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आगीदरम्यान धुराचे लोट उठले होते. इमारतीवर छत असल्याने संपूर्ण इमारतीत धूर पसरला. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असणाऱ्या लॉजमध्ये काही नागरिक अडकल्याची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी व पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. लॉजमधील 5 व्यक्तींची सुखरूप सुटका केली. उष्णतेच्या वातावरणातही जवानांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे जीवित हानी टळली. परिसरातील उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाचे कौतुक केले आहे. रखवालदार मुलाणी यांनी तत्परतेने आगीची माहिती दिल्याने वेळीच आग आटोक्यात आणता आली, असे सांगत माळी यांनी मुलाणी यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT