arrest File Photo
सांगली

Sangli Crime : तीन राज्यांत धुमाकूळ घालणाऱ्या 'टाक गँग'च्या दरोडेखोराला अटक

मिरजेत कारवाई; मोटारीसह साहित्य जप्त, चाैघे पसार

पुढारी वृत्तसेवा

मिरज : महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील दरोड्यांच्या प्रकरणांमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या कुख्यात 'टाक गँग'मधील एका दरोडेखोराला मिरज पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या. कुलदीपसिंग गगनसिंग टाक (रा. परभणी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून मोटार आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्याचे अन्य चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेतील शाहू चौकात मिरज वाहतूक पोलिस नाकाबंदी करत असताना एक मोटार संशयितरीत्या थांबलेली पोलिसांना दिसून आली. वाहतूक पोलिस गाडीची तपासणी करण्यासाठी गेले असता गाडीतील दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून कुलदीपसिंग टाक याला ताब्यात घेतले, तर त्याचे उर्वरित चार साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले.

मिरजेत दरोड्याचा कट उधळला

ही टोळी मिरज शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच आली होती; मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने हा कट उधळला गेला. संशयिताच्या ताब्यातून कटावणी, मिरची पूड आणि दरोड्यासाठी लागणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आलेे. या कारवाईमुळे तीन राज्यांतील अनेक घरफोड्या व दरोड्यांचे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार असून, पसार झालेल्या चार दरोडेखोरांच्या शोधासाठी मिरज शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

तीन राज्यांतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

अटक केलेल्या संशयिताकडे प्राथमिक चौकशी केली असता 'टाक गँग' आंतरराज्य दरोडेखोर टोळी असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात अनेक गंभीर दरोडे टाकले असून, गेल्या सात वर्षांपासून तीन राज्यांतील पोलिस त्यांच्या शोधात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT