मिरज : सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी सांगली-मिरज मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जरांगे-पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे सुरू असलेले उपोषण सातव्या दिवसात पोहोचले असून, सरकारने आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष शासन निर्णय काढावा, अशी त्यांची भूमिका आहे. सरकारला १० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सांगली-मिरज मार्गावर झालेल्या चक्काजाममुळे वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन शांततेत पार पडावे, यासाठी पोलिस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात पप्पू शिंदे, धनंजय भिसे, संजय पाटील, तानाजी भोसले, संजय मेथे, बाळासाहेब पाटील, विलास देसाई, अशोक पाटील आदी सहभागी झाले होते.