सांगली, मिरजेत पोलिसांचे संचलन 
सांगली

सांगली, मिरजेत पोलिसांचे संचलन

कायदा हातात घेणार्‍यांवर कडक कारवाई होणार : पोलिस अधीक्षक संदीप घुगे

पुढारी वृत्तसेवा

सांगली/मिरज : गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सांगली, मिरजेत पोलिसांनी संचलन केले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वात हे संचलन पार पडले. सणांच्या पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणार्‍यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.

मुंबई, पुणे, त्यानंतर सर्वाधिक काळ गणेशोत्सव मिरजेत चालतो. अनंतचतुर्दशीस पश्चिम महाराष्ट्रातून भाविक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मिरजेत येत असतात. तसेच सांगलीत पाचव्या दिवशी श्री गणपती पंचायतनच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक पार पडते. या दिवशीही भाविक मोठ्या संख्येने सांगलीत येत असतात. अनंतचतुर्दशीच्या आदल्या दिवशी ईद आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी उपद्रवी लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अनंतचतुर्दशीपर्यंत सराईतांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी सांगली आणि मिरज शहरातून पोलिसांनी संचलन केले. यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलिस उपअधीक्षक विमला एम., मिरजचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक भैरू तळेकर, प्रफुल्ल कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश शिंदे, सांगली शहरचे संजय मोरे, सांगली ग्रामीणचे किरण चौगुले, संजयनगरचे सूरज बिजली, विश्रामबागचे सुधीर भालेराव, मिरज शहरचे किरण रासकर, मिरज ग्रामीणचे अजित सिद, महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह 60 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 500 अंमलदार, दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दल, एसआरपीएफची दोन पथके, 20 वाहने सहभागी झाली होती. सांगली शहरातून स्टेशन चौक, पटेल चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, हरभट रोड, मारुती रोड परिसरात संचलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली. मिरजेतील शहर पोलिस ठाण्यापासून संचलनाला सुरुवात झाली. गुरुवारपेठ, हिरा हॉटेल चौक, स्टँड चौक, दर्गा रोडमार्गे मिरज शहर पोलिस ठाण्याजवळ सांगता केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT