सांगली, मिरजेत 75 नशेखोरांचे मोडले कंबरडे Pudhari
सांगली

Sangli Crime : सांगली, मिरजेत 75 नशेखोरांचे मोडले कंबरडे

डार्क स्पॉटवर पोलिसांची कारवाई : पोलिसांनी तळीरामांची नशाच उतरवली

पुढारी वृत्तसेवा

सांगली/मिरज : सांगली आणि मिरज शहरात डार्क स्पॉटवर नशा करणाऱ्या 75 नशेखोरांचे कंबरडेच पोलिसांनी मोडले. नशेखोरांवर जागेवरच कारवाई करून पोलिसांनी त्यांची नशाच उतरवली. शनिवारी रात्री सांगली उपविभागात 25, तर मिरज उपविभागात 50 नशेखोर, तळीरामांवर कारवाई करण्यात आली.

सांगली जिल्ह्यामध्ये नशेतून खून, खुनाचा प्रयत्न आणि मारामारी अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत होत्या. शहरातील लिमये मळा परिसरात रस्त्याकडेला नशा करत थांबलेल्या नशेखोरांनी एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, नशेखोरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नागरिकांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर धाव घेत मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांनी नशेखोरांवर कारवाई करण्याचा जणू बडगाच उगारला आहे. सलग दुसऱ्यांदा डार्क स्पॉट असणाऱ्या ठिकाणांवर नशा करत तसेच दारू पित बसणाऱ्या तळीरामांवर जागेवरच पोलिसांनी कारवाई केली.यामध्ये सांगली उपविभागातील सांगली शहर, विश्रामबाग पोलिस ठाणे, संजयनगर पोलिस ठाणे या तीन पोलिस ठाण्यांच्या आखत्यारीत येणाऱ्या डार्क स्पॉटवर 25 जणांवर कारवाई करण्यात आली. मिरज उपविभागातील मिरज शहर, महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाणे या तीन पोलिस ठाण्यांच्या आखत्यारीत येणाऱ्या डार्क स्पॉटवर 50 जणांवर कारवाई करण्यात आली.

सांगली, मिरज शहरांमध्ये नशेखोरांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे चित्र निर्माण झाले होते. संबंधित ठिकाणी नशा करण्यास नागरिकांनी विरोध केल्यास त्यांचा खून करण्यापर्यंत नशेखोरांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. नशेखोरांचा बीमोड करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना, तुम्ही रस्त्यावर उतरता की आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशाराच दिला होता. त्यामुळे आता पोलिसांनी नशेखोर आणि तळीरामांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या आठवड्यात पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध डार्क स्पॉटवर छापे टाकून कारवाई केली होती. आता सलग दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नशेखोर आणि तळीरामांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे. डार्क स्पॉट जाहीर करण्यात आलेल्या ठिकाणी कोणीही नशा करण्यासाठी तसेच दारू पिण्यासाठी बसू नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

या कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहायक निरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक स्नेहा शिर्के यांच्यासह 100 हून अधिक पोलिस सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT