सांगली

Sangli News| विकास कामे रद्द केल्यास सामूहिक राजीनामा देऊ

मिरज पंचायत समिती सभेत सदस्यांचा इशारा; नदीतील गाळ काढण्यासदेखील विरोध

पुढारी वृत्तसेवा

मिरज : दुष्काळी आदेशाचे कारण पुढे करून तालुक्यातील विकास कामांचा आराखडा रद्द केल्यास सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा मिरज पंचायत समितीच्या सदस्यांनी सोमवारी मासिक सभेत दिला. सध्या कृष्णा व वारणा नदीमध्ये गाळ काढण्याचे काम सुरू आहे. ते काम त्वरित रद्द करावे, असा ठरावदेखील आजच्या सभेत करण्यात आला.

पंचायत समिती सभापती राणी भोरे, उपसभापती ललिता शेजुळ, गटविकास अधिकारी किरण सायमोते, सहायक गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल मिरज पंचायत समितीच्या छत्रपती श्री संभाजी महाराज सभागृहामध्ये मासिक सभा झाली. पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना मिळणाऱ्या निधीला दुष्काळाच्या आदेशाचे कारण पुढे करून कात्री लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कामांचा आराखडा बदलू नका, आम्ही सुचवलेली कामे रद्द करू नका, अन्यथा आम्ही सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा देत सदस्य आक्रमक झाले होते. आम्ही सुचवलेल्या कामांची जनता प्रतीक्षा करीत आहे. असे असताना ही कामे जर रद्द केली तर आम्ही जनतेसमोर जायचे कसे ? असा सवालदेखील यावेळी या सदस्यांनी केला. राजेंद्र माळी, बाळासाहेब पाटील, विष्णू पाटील, पांडुरंग पाटील, पांडुरंग इंगळे, विनायक जाधव, अरविंद सपकाळ, शोभा मोहिते, सूरज मगदूम, गायत्री घोरपडे, सुप्रिया तवटे, सुजाता पाटील, जयश्री पाटील, अमृता गावडे, तनवी कमलेकर, स्नेहल पाटील, संयोगिता कोळी यांनी काल सभेमध्ये विविध विषयांवर चर्चेमध्ये सहभाग घेतला.

सलगरे येथे जन सुविधा नागरी सुविधा या योजनेंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या कामामध्ये संबंधित ठेकेदाराने भ्रष्टाचार केल्याचा आरोप सदस्यांनी केला. हे काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे आणि त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. शिवाय याबाबत ठरावदेखील मंजूर करण्यात आला. तालुक्यातील बेडग येथील पाणी योजना रखडली आहे. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदारांना जगवण्याचे काम सुरू आहे, असा आरोप करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे नदीचे खोलीकरण करण्याचा विषय पुढे आला होता. त्यामुळे त्यावेळी नदीचे खोलीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता नदीपात्रात पाणी कमी असल्याने या नदीचे खोलीकरण करणे योग्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT