सांगली

Miraj Panchayat Samiti: मिरज पंचायत समिती सभापतींची निवड रद्द

काँग्रेससह सत्ताधाऱ्यांना धक्का : नव्याने निवड करण्याचे पुणे विभागीय आयुक्तांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरज पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक रद्द करून ती नव्याने घेण्याचे आदेश पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशानुसार काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर यांची निवड अखेर रद्द झाली असून, हा मिरज पंचायत समितीमधील काँग्रेससह सत्ताधारी गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

मिरज पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर एकूण २२ सदस्य संख्या असणाऱ्या या सभागृहात भाजपचे ११ सदस्य निवडून आले होते. या निवडणुकीनंतर १० मार्च २०२६ रोजी सभापती व उपसभापतिपदाची निवड करण्यासाठी पंचायत समिती सभागृहात विशेष सभा घेण्यात आली होती.

मात्र, या निवडणुकीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच ९ मार्च रोजी सायंकाळी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सदस्य पांडुरंग इंगळे हे मतदानासाठी पोहोचू नयेत म्हणून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. या अपहारणामुळे पांडुरंग इंगळे यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

या वादग्रस्त निवडणुकीत ११ विरुद्ध १० अशा अवघ्या एका मताच्या फरकाने सभापतींची निवड जाहीर करण्यात आली होती. एक मतदाराचे अपहरण झाल्याने ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर झाली आहे, त्यामुळे ही प्रक्रिया अवैध घोषित करण्यात यावी, अशी मागणी करत पुणे विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT