Sangli municipal corporation | Pudhari Photo
सांगली

Sangli News| महापालिका यंत्रणा सक्षम असताना स्वच्छतेचा ठेका का?

नागरिक जागृती मंचचा सवाल; काय चालवताय, महापालिका की ठेकेदारी?

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मिरज शहरातील कचरा संकलन व स्वच्छतेसाठी प्रस्तावित सुमारे २३.१५ कोटी रुपयांच्या खासगी ठेक्याला नागरिक जागृती मंचने विरोध केला आहे. महापालिकेची यंत्रणा सक्षम असताना ठेका कशासाठी? महापालिका चालवताय की ठेकेदारी चालवताय?, असा प्रश्न नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केला आहे.

साखळकर म्हणाले, मिरज शहरातील कचरा उठाव व स्वच्छतेच्या कामाचा ठेका देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या महासभेसमोर आणला आहे. मंचने याबाबत शासन व महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मिरज शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेसाठी सुमारे २३.१५ कोटी रुपयांचा ठेका २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेसमोर मंजुरीसाठी येणार आहे. महापालिकेकडे स्वत:चे स्वच्छता कर्मचारी, घंटागाड्या, कॉम्पॅक्टर, वाहने आणि प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असताना खासगी ठेकेदाराची आवश्यकता का भासत आहे? महापालिकेच्या विद्यमान कर्मचाऱ्यांचे वेतन आणि खासगी ठेकेदाराचा खर्च यामुळे दुहेरी आर्थिक भार निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित ठेक्याची कागदपत्रे, दरविश्लेषण आणि तुलनात्मक आर्थिक अहवाल सार्वजनिक करावेत, ठेक्याला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी स्वतंत्र आर्थिक व तांत्रिक परीक्षण करण्यात यावे, महापालिकेच्या विद्यमान यंत्रणेमार्फत ही कामे कमी खर्चात आणि अधिक प्रभावीपणे करता येतील काय, याचा स्वतंत्र अभ्यास करण्यात यावा.

महानगरपालिका ही काही मोजक्या व्यक्तींच्या सोयीसाठी किंवा ठेकेदारांच्या आर्थिक हितासाठी चालणारी व्यवस्था असू शकत नाही. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा पुरविणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. जनतेवर कराचा बोजा वाढवून आणि दुसरीकडे अनावश्यक खर्चाला मंजुरी देऊन कारभार चालविणे हा सुशासनाचा आदर्श होऊ शकत नाही, असेही साखळकर यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT