सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरांतील पाणीप्रश्नावरून बुधवारी महासभेत गदारोळ झाला. यापूर्वी नदी कोरडी पडली असतानाही नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत होता, आता नदीत पाणी असतानाही नागरिकांना पाणी का मिळत नाही, निवडणुकीनंतरच पाणी टंचाई का जाणवू लागली, अशा प्रश्नांची सरबत्ती करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणीप्रश्नावरून महापौर धीरज सूर्यवंशी यांनीही स्पष्ट नाराजी व्यक्त केली. पाणी व ड्रेनेजप्रश्नी दि. 23 मार्च रोजी विशेष महासभा घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
महापालिका सभागृहात बुधवारी महासभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर धीरज सूर्यवंशी होते. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त सत्यम गांधी, तसेच स्थायी समितीचे सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, महिला व बालकल्याण समिती सभापती बानू जमादार, समाजकल्याण सभापती गीता पवार, प्रभाग समित्यांचे सभापती अश्विनी कोळेकर, वैशाली गवळी, माया गडदे, अश्विनी कोळी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
महासभा सुरू होताच काँग्रेसच्या नगरसेविका सभागृहात रिकाम्या घागरी घेऊन आल्या. सभागृहात महापौरांसमोर रिकाम्या घागरी ठेवल्या आणि घोषणाबाजी करू लागल्या. शहरांतील पाणीप्रश्न केव्हा सुटणार, नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा केव्हा होणार, असा सवाल त्या आक्रमकपणे करू लागल्या आणि एकच गोंधळ उडाला. दरम्यान, नदीत पाणी असताना पाणीप्रश्न का उद्भवला आहे, असा प्रश्न महापौर सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना केला. प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश दिले. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे माहिती देऊ लागले.
कमी झालेली नदीची पाणी पातळी, त्याचा पाणी उपशावर झालेला परिणाम, खंडित वीज पुरवठा, जुन्या पाईपलाईनही सुरू असणे, नळ कनेक्शनला विद्युत पंप लावण्याचे वाढते प्रकार आदी काही कारणे सांगत असतानाच नगरसेवक व महापौरही आक्रमक झाले. नदी कोरडी असताना पाणी मिळाले, आता नदीत पाणी असताना पाणी का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील हे माहिती देऊ लागले. नगरसेवक अभिजित भोसले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेवरून आवाज उठवला. पाणी उपसा क्षमता वाढवा, टाक्या पूर्ण क्षमतेने भरून घ्या, अखंडित वीज पुरवठा होईल, याबाबत नियोजन करा, जलवाहिन्या, त्यांचे जोड व व्हॉल्व्हचे मॅपिंग करा, झोनिंग प्रभावीपणे करा, आदी उपाय भोसले यांनी सुचवले.
सांगलीवाडीला रोज 34 लाख लिटर पाणीपुरवठा आवश्यक असताना 23 लाख लिटर पाणीपुरवठा होत असल्याकडे अभिजित कोळी यांनी लक्ष वेधले. विष्णू माने, योगिता राठोड, मालुश्री खोत, चेतन सूर्यवंशी, छाया पाटील, प्राजक्ता धोतरे, प्रकाश पाटील यांनी कुपवाड व विस्तारित भागातील पाणी टंचाईकडे लक्ष वेधले. जादा पाणी उपसा करूनही टंचाई का भासते, असा प्रश्न सोनल पाटील-सावर्डेकर यांनी केला. फिरोज पठाण, स्मिता यमगर, संतोष पाटील, रोहिणी पाटील, जगन्नाथ ठोकळे, रमेश सर्जे यांनी पाणी टंचाईवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. गटार कुलीला पंप ऑपरेटरचे काम दिले, तर पंप पूर्ण क्षमतेने कसे चालतील, असा प्रश्न दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला. प्रभागात पाणीपुरवठ्याच्या चार-चार लाईन कार्यान्वित असल्याकडेही लक्ष वेधले. दोन महिन्यांऐवजी आठ महिन्यांचे पाणी बिल आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गॅस मिळतोय; पण पाणी नाही
पाणीपुरवठा पाईपलाईनची गळती काढली जात नसल्याची तक्रार युवराज गायकवाड यांनी केली. मिरजेत गॅस सिलिंडर मिळतोय, पण पाणी मिळत नाही, अशी तक्रार मोहन वाटवे यांनी केली. पाणीपुरवठ्याची अमृत योजना मृत झाली की काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाणी टंचाईला व्हॉल्व्हमनचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे, त्यांच्या सरसकट बदल्या करा, अशी मागणीही वाटवे यांनी केली. मिरज शहरात सर्व प्रभागात पाणीटंचाई जाणवत आहे, अमृत योजना अपयशी ठरली आहे, अशी नाराजी बिलकिस बुजरूक यांनी व्यक्त केली. वित्त आयोगाचे 48 कोटी रुपये आले असताना पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल संजय मेंढे यांनी केला.
शहरांतील पाणीप्रश्नाचे आव्हान आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वीकारावे व हा प्रश्न सोडवावा, असे सभागृह नेते संदीप आवटी यांनी म्हटले. पाणीप्रश्नी सर्वच प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात. नगरसेवकांच्या तीव्र भावना लक्षात घेत पाणी व ड्रेनेजप्रश्नी दि. 23 मार्चरोजी विशेष सभा बोलविण्यात येत आहे, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले. प्रशासक कालावधीतील भूसंपादन आणि त्यासाठी दिलेला मोबदला यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. सभागृहात फलक उंचावून आणि डायसच्या दिशेने जात घोषणाबाजी करत या विषयाकडे लक्ष वेधून घेतले. त्यावर महापौर सूर्यवंशी म्हणाले, सर्वच गटनेत्यांची एक बैठक बोलावली जाईल. भूसंपादनासंबंधित विषय निश्चित करू व ते महासभेपुढे चर्चेला आणू.
वारणा उद्भव की चांदोली?
महापालिका क्षेत्रात तीन आमदार आहेत. राज्य, केंद्रात भाजपची सत्ता आहे. सत्तेचा उपयोग करून शहरांचा पाणीप्रश्न संपवा. वारणा उद्भव पाणी योजना राबवायची, की थेट चांदोली धरणातून पाणी आणायचे, हेही एकदा निश्चित करा, अशी मागणी लक्ष्मण नवलाई यांनी केली. पाणीप्रश्नी महापौर यांनी लक्ष घालावे. जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्राला अखंडित वीज पुरवठा व्हावा, यादृष्टीने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली.
मोटारी जप्त करा; झिरो व्हॉल्व्हमन
मिरजेत नळ कनेक्शनला विद्युत पंप लावले जात आहेत, त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. हे विद्युत पंप जप्त करा. त्यासाठी पथक नेमा पथकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश करा. पाणीपुरवठा विभागाकडे कर्मचारी संख्या वाढवावी. काही व्हॉल्व्हमननी आपल्या कामासाठी झिरो व्हॉल्व्हमन नेमले आहेत. ते आपल्या मर्जीने कधीही आणि कसेही पाणी सोडत आहेत. या सर्व बाबी गांभीर्याने घ्या, अशी मागणी निरंजन आवटी यांनी केली.