सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : नालेसफाई बिलावरून स्थायी सभेत वादळी चर्चा

दोनदा पैसे काढल्याचा आरोप : चार वर्षांतील खर्चाचा अहवाल मागवला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या बिलावरून गुरुवारी स्थायी समिती सभेत वादळी चर्चा झाली. 2022-23 मध्ये ठेकेदाराला वेगवेगळ्या तीन लेखाशीर्षातून दोनदा बिले दिली असल्याचा आरोप नगरसेवक अभिजित भोसले यांनी केला. त्यावर सभापती अतुल माने यांनी, गेल्या चार वर्षात नालेसफाईवर झालेल्या खर्चाचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभा झाली. सभापती अतुल माने अध्यक्षस्थानी होते. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून नालेसफाईचा मुद्दा गाजत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गुरुवारी स्थायी समिती सभेतही यावर वादळी चर्चा झाली. नगरसेवक भोसले यांनी हा विषय सभेत उपस्थित केला. दि. 16 डिसेंबर 2022 व 21 एप्रिल 2023 या दोन ठरावाद्वारे नालेसफाई झाली आहे. बिल मात्र दोनदा काढले आहे. त्यासाठी तीन लेखाशीर्षांचा आधार घेऊन 4.10 कोटींचे बिल काढले आहे. 2026 मध्ये नालेसफाईसाठी 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला असताना 2023 मध्ये 4.10 कोटी खर्च कसा झाला, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर नजरचुकीने चुकीचा ठराव क्रमांक पडल्याचा खुलासा तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी केला असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पण या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. डॉ. ताटे यांना पुढील स्थायी सभेत हजर राहण्यास व गेल्या चार वर्षातील नालेसफाईच्या खर्चाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

नव्या कोऱ्या वहीत लॉगबुक; 21 वह्या घेतल्या ताब्यात

वार्षिक एजन्सीतील वाहन पुरवठा ठेकेदाराने किती वाहने पुरविली?, त्याचे लॉगबुक ठेवले आहे का? असे प्रश्न मागील सभेत उपस्थित करण्यात आले होते. त्यावर सभेत अधिकाऱ्यांनी लॉगबुक सादर केले. पण हे लॉगबुक नियमानुसार नव्हते. एका नव्या कोऱ्या वहीत नुकत्याच नोंदी केल्याचा संशय बळावला. किती वाहनांनी किती तास काम केले, याची नोंद करण्यात आली होती. हा प्रकार पाहून सभापती अतुल माने यांनी संताप व्यक्त केला. एका ठिकाणी बसून वहीमध्ये लॉगबुक तयार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व 21 लॉगबुकचे ऑडिट करून अहवाल देण्याचे आदेश सभापती माने यांनी महापालिकेच्या लेखापरीक्षकांना दिले. वह्या ताब्यात घेऊन अतिरिक्त आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT