उध्दव पाटील
सांगली : महानगरपालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर (घरपट्टी) आकारणी लागू होणार आहे. या नव्या पद्धतीत रेडीरेकनर दर हा घरपट्टी निश्चितीचा महत्त्वाचा आधार आहे. ज्या भागाचा रेडीरेकनर जास्त, त्या भागातील नागरिक आणि व्यावसायिकांना घरपट्टी अधिक, तर रेडीरेकनर दर कमी असलेल्या भागात घरपट्टी कमी लागेल.
महात्मा गांधी रोड, पटेल चौक, हायस्कूल रोड, गावभाग, हरभट रोड, गणपती पेठ, राजवाडा चौक, पटेल चौक, हायस्कूल रोड, सिव्हिल हॉस्पिटल रोडवर कर भार अधिक, तर विजयनगर परिसर, धामणी रोडसारख्या विकसित होत असलेल्या भागात तुलनेने कमी कर भार लागेल. विशेष म्हणजे पूरग्रस्त भागात रेडीरेकनर दर अधिक असल्याने मालमत्ता करही तुलनेने जास्त लागण्याची शक्यता आहे.
रेडीरेकनर म्हणजे शासनाने प्रत्येक भागातील जमीन आणि बांधकामाचे ठरवलेले किमान बाजारमूल्य. नोंदणी व मुद्रांक शुल्कासाठी हे दर वापरले जातात. भांडवली मूल्य पद्धतीत घर किंवा इमारतीचे मूल्य ठरवताना साधारणपणे जागेचे क्षेत्रफळ, बांधकामाचे क्षेत्रफळ, मालमत्तेचा वापर, परिसराचा दर्जा, इमारतीचे वय, त्या भागाचा रेडीरेकनर दर विचारात घेतला जातो. भांडवली मूल्य पद्धतीत मालमत्तेची बाजारातील अंदाजे किंमत हा आधार घेतला जातो. रेडीरेकनर दर वाढला की भांडवली मूल्य वाढते व अर्थात मालमत्ता कर (घरपट्टी) वाढू शकते.
शहरातील महात्मा गांधी रोडवरील निवासी सदनिकेचा रेडीरेकनर दर प्रति चौरस मीटर 61,390 रुपये, हायस्कूल रोडवर 57,080 रुपये, पटेल चौक ते राजवाडा चौक 45,870 रुपये आहे. गावभागात निवासी सदनिकेचा रेडीरेकनर दर 42 हजार ते 49 हजार रुपये, पंचमुखी मारुती रस्ता 35,750 रुपये, खणभाग 34,890 रुपये, नेमिनाथनगर परिसर 32,190 रुपये, सांगली-मिरज रोड 36,410 रुपये, टिंबर एरिया ते माधवनगर रोड 27,380 ते 30,650 रुपये, कुपवाड गावठाण रस्ता 24,910 रुपये आहे. विशेषतः दुकान गाळ्यांसाठी काही भागांमध्ये प्रति चौरस मीटर रेडीरेकनर दर 72 ते 76 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे संबंधित भागातील व्यावसायिक मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात कर लागू शकतो.
सिव्हिल हॉस्पिटल रोड एसटी स्टँड ते क्रांती क्लिनिक या भागात दुकाने 62,350 रुपये दराने आहेत. सांगली-मिरज रोडवरील काही भागांत दुकानांचे दर 69 हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यालगतच्या दुकानांवर तुलनेने कर भार अधिक असण्याची शक्यता आहे. वखारभाग, पंचमुखी मारुती रस्ता, गुजराती हायस्कूल परिसर, सिव्हिल हॉस्पिटल रोड, सांगली-मिरज रोड यांसारख्या मध्यवर्ती आणि विकसित भागांमध्येही निवासी व व्यावसायिक मालमत्तांचे रेडीरेकनर दर तुलनेने जास्त आहेत.
दुसरीकडे शहराच्या बाह्य आणि तुलनेने कमी विकसित भागांमध्ये रेडीरेकनर दर कमी आहेत. कुपवाड गावठाण परिसरात निवासी सदनिकांचे दर 24 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. वालचंद कॉलेज परिसर, उर्वरित पेठभाग, आमराई-जामवाडी, आकाशवाणी परिसर, सांगलीवाडी, टीव्ही केंद्रापर्यंतचा कोल्हापूर रस्ता परिसर येथे रेडीरेकनरचे दर तुलनेने कमी दिसून येतात. त्यामुळे या भागातील घरपट्टीचा भार तुलनेने कमी राहू शकतो. भांडवली मूल्य पद्धतीमुळे जागेची किंमत जितकी जास्त, तितकी घरपट्टी जास्त, हे सूत्र लागू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती व्यापारी पेठा, मुख्य रस्ते आणि उच्चभ्रू भागातील मालमत्ता धारकांना भविष्यात वाढीव घरपट्टीचा सामना करावा लागू शकतो, तर उपनगर आणि कमी रेडीरेकनर असलेल्या भागांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
भाडे मालमत्तांना यापूर्वीच्या पद्धतीत घरपट्टी मोठ्या प्रमाणावर लागत होती, मात्र आता भांडवली पद्धतीत तुलनेने कमी घरपट्टी लागेल. याचा भाड्याने दिलेल्या निवासी इमारतींबरोबरच अनिवासी म्हणजे वाणिज्य व औद्योगिक वापराच्या इमारतींना मोठा लाभ होईल. महापालिका पुढील आठवड्यात मालमत्ता कराच्या (घरपट्टी) नोटिसा मालमत्ता धारकांना देणार आहे. त्यावेळी घरपट्टी वाढली, तेवढीच राहिली, की कमी झाली हे संबंधित मालमत्ता धारकांना समजून येईल.