महापालिकेचा 1065 कोटींचा अर्थसंकल्प ‌‘स्थायी‌’कडे सादर 
सांगली

Sangli News : महापालिकेचा 1065 कोटींचा अर्थसंकल्प ‌‘स्थायी‌’कडे सादर

12 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प, पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप उभारणार : ई-बस सेवा सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेचा 2026-27 चा 1065 कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी यांनी मंगळवारी स्थायी समिती सभेत सभापती अतुल माने यांना सादर केला. महापालिकेच्या सर्व प्रशासकीय इमारती तसेच महापालिकेच्या खुल्या जागांवर 12 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, पेट्रोल-डिझेल व सीएनजी पंप उभारणे, ई-बस सेवा कार्यान्वित करणे, खुल्या जागा तसेच वापरात नसलेल्या जागा भाडेतत्त्वावर देणे, तसेच विविध योजना, कामांवरील तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

हा अर्थसंकल्प महसुली व भांडवली 50 कोटी संभाव्य शिलकीचा असला तरी, प्रत्यक्षात 49 कोटी रुपये महसुली तुटीचा आहे. महापालिकेचा 2026-27 चा मूळ अर्थसंकल्प 1065 कोटी 24 लाख 3 हजार 380 रुपये जमेचा व 1014 कोटी 96 लाख 74 हजार 473 रुपये खर्चाचा आणि 50 कोटी 27 लाख 28 हजार 906 रुपये शिलकीचा आहे. आयुक्त गांधी यांनी करवाढ व दरवाढ न करता, खर्चात काटकसर आणि उत्पन्नवाढीवर भर दिला आहे.

आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिकेचा सुमारे 50 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प असला तरी, महसुली जमा-खर्चात प्रत्यक्षात 47 कोटी रुपयांची तूट आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जमेचा विचार करून योजना राबवण्यावर भर दिला आहे. पथदिव्यांचे वीज बिल वगळता पाणीपुरवठा, जल:निस्सारण व अन्य उपक्रमांवरील वार्षिक वीज बिल सुमारे 35 कोटी रुपये आहे. वीज बिलाचा खर्च यापुढे वाढतच जाणार आहे. याचा विचार करून महापालिकेच्या सर्व प्रशासकीय इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रोजेक्ट तसेच महापालिकेच्या सुमारे 35 एकर जागेवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. इमारती व खुल्या जागेवरील सौर प्रकल्पातून 12 मॅगावॅट क्षमतेची सौरवीज निर्माण होईल. यासाठी एकदाच सुमारे 40 ते 45 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर पुढील 10 ते 15 वर्षे यातून मोफत वीज मिळणार आहे. वीज बिलांवरील वार्षिक सुमारे 35 कोटींचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महापालिकेला फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 10 कोटींची तरतूद केली आहे. केंद्र व राज्य शासनाकडूनही या प्रकल्पाला निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे.

आयुक्त गांधी म्हणाले, महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केवळ करांच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधले जात आहेत. शहरात मोक्याच्या जागी पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. महापालिकेचा वाहनांवरील इंधनावर वार्षिक सुमारे 7 ते 8 कोटींचा खर्च होतो. त्यामुळे महापालिकेचा पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंप महापालिकेला उपयुक्त ठरणार आहे. खासगी ग्राहकांना पेट्रोल, डिझेल, सीएनजी उपलब्ध करून दिले जाईल. त्यातून महापालिकेला वार्षिक दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. पंप उभारणीसाठी अर्थसंकल्पात 3 कोटींची तरतूद केली आहे. उत्पन्न वाढीसाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या जागा, गाळे, कमी वापरातील इमारती भाड्याने देण्यात येणार आहेत. नवीन नाट्यगृह उभारणे, शासकीय योजनांसाठी द्यावा लागणारा 30 टक्के हिस्सा, विविध योजनांच्या व्याजाच्या रकमांचा विनियोग करून शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. महापालिकेची भौगोलिक रचना, पाणीपुरवठा, रस्ते व गटारी या मूलभूत सेवांबाबत सद्यस्थिती व जनतेच्या महापालिकेकडून असलेल्या अपेक्षा विचारात घेता, सन 2026-27 चा अर्थसंकल्पीय अंदाज हा पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे, असे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.

व्याज आले धावून; 43 कोटी लाभले

गेल्या दहा वर्षांत विविध योजनांसाठी आलेला निधी खर्च होईपर्यंत बँकांमध्ये होता. शंभर कोटींच्या विशेष निधीवर 3.50 कोटी, नागरी वनीकरणच्या निधीवर 1.50 कोटी, अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती विकासच्या निधीवर 4 कोटी, पायाभूत सुविधांच्या जमा निधीवर 62 लाख, मूलभूत सुविधांसाठी आलेल्या निधीवर 1 कोटी, सांगली ड्रेनेज योजनेच्या जमा निधीवर 12 कोटी, इंदिरानगर घरकुल योजनेच्या जमा निधीवर 14 कोटी रुपये, असे व्याज जमा झालेले आहे. व्याजाची ही एकूण रक्कम 43 कोटी रुपये आहे. ही रक्कम आता महापालिकेच्या विविध योजनांसाठी धावून आली आहे.

परिवहन समिती स्थापन होणार

महापालिका प्रधानमंत्री ई-बस सेवा कार्यान्वित करणार आहे. महापालिका क्षेत्र व लगतच्या भागात ही बस सेवा सुरू होईल. 50 ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. महापालिकेची परिवहन समिती स्थापन होईल. या समिती सदस्यांच्या बैठका, भत्त्यांवर 10 लाख रुपयांची टोकन तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली.

2026-27 अपेक्षित खर्च

महसुली खर्च : 368.14 कोटी (76.67 टक्के)

पाणी पुरवठा व जलनि:सारण महसुली/भांडवली : 18.70 (3.89 टक्के)

भांडवली अ : 93.34 (टक्केवारी 19.44 टक्के)

एकूण महसुली, भांडवली अ : 480.18 कोटी

ब्ल्यू बजेट कामे, योजनांसाठी खर्च : 15 कोटी

ग्रीन बजेट खर्च : 57.60 कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT