सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत आता स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 8 झाली आहे. भाजपमधून 4, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीतून 2 जणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. निवडणुकीत नेत्यांनी अनेकांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देऊन थंड केले होते. त्यापैकी कोणा-कोणाला संधी मिळणार, हे आता औत्सुक्याचे ठरत आहे.
राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने दि. 23 मार्च 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक संख्येत बदल झाला आहे. निवडून आलेल्या नगरसेवक संख्येच्या 10 टक्के किंवा दहा यापैकी कमी असलेली संख्या ही स्वीकृत नगरसेवक संख्या असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या 78 आहे. त्यामुळे दहा टक्क्यानुसार ही संख्या 7.8 होते. पूर्णांकात ती 8 होते. ही संख्या 10 पेक्षा कमी आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक 8 असतील.
भाजपचे 39, काँग्रेसचे 18, राष्ट्रवादीचे 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. हे संख्याबळ पाहता भाजपचे 4, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक होतील. भाजपकडून युवा मोर्चाचे माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष सुजित राऊत, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, केदार खाडिलकर, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शीतल लोंढे यांचे नाव चर्चेत आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचेही नाव पुढे येऊ शकते. सांगलीवाडीतील पराभवामुळे भाजपला पुन्हा उभारी मिळावी, यासाठी माजी सभापती अजिंक्य पाटील यांचाही विचार होऊ शकतो. भाजपकडून एक वर्षासाठी स्वीकृत नगरसेवकपद दिले जाईल, असे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसकडून दोनपैकी एक पद मुस्लिम समाजास मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून माजी सभापती स्नेहल सावंत अथवा सचिन सावंत यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
इच्छुकांची संख्या मोठी...
महापालिका निवडणुकीत भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. पक्षाने उमेदवार निश्चित केल्यानंतर उमेदवारी न मिळालेले अनेकजण नाराज झाले. काहींनी बंडाचा झेंडा फडकवला, तर काहीजण संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले. त्यानंतर नेत्यांनी अनेकांची समजूत घातली. त्यावेळी काहींना स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावू, असा शब्द दिला होता. त्यामुळे कोणाकोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.