सांगली : महापालिकेची स्थायी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण तसेच चार प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी दि. 13 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. स्थायी समिती सभापतिपदी आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अतुल माने यांच्या निवडीचे संकेत मिळत आहेत.
महापालिका स्थायी समितीतील 16 सदस्यांसह महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण समितीवरील सदस्यांची निवड सोमवारी महासभेत झालेली आहे. महासभेत चारही प्रभाग समित्यांची रचना झाली आहे. दरम्यान, स्थायी समितीसह सात समितींच्या सभापती निवडीकडे लक्ष लागले होते. स्थायी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण तसेच चारही प्रभाग समित्या स्थापन झाल्याचा महासभेचा ठराव महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवला. त्यावर गुरुवारी विभागीय आयुक्तांनी या समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व समित्यांच्या सभापतींची निवड दि. 13 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून महापालिकेच्या राजाभाऊ जगदाळे सभागृहात होणार आहे. या निवडी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.
स्थायी, महिला व बालकल्याण, समाजकल्याण तसेच चारही प्रभाग समितींच्या सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे अतुल माने, ॲड. स्वाती शिंदे व गणेश माळी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक अतुल माने यांना पहिल्या वर्षी सभापती पदाची संधी मिळेल. दरम्यान, आमदार सुरेश खाडे समर्थक गणेश माळी यांना दुसऱ्या वर्षी स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
महिला व बालकल्याणसाठी राष्ट्रवादी आग्रही
महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण या दोन समित्यांपैकी एका समितीचे सभापती पद राष्ट्रवादीला मिळावे, यासाठी भाजपकडे मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी दिली.