Malaria Pudhari
सांगली

Miraj Malaria Outbreak: मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मिरज येथील सांगली-मिरज रस्त्यालगत रेल्वे पुलाजवळील कारगिल झोपडपट्टी (मिरज) येथे हिवतापाचे (मलेरिया) ५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप विभागाने येथे हिवताप उद्रेक घोषित केला आहे.

महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा मलेरिया विभागाने जलद ताप सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना तातडीने सुरू केल्या आहेत. या झोपडपट्टीत गेल्यावर्षी हिवतापाचे २४ रुग्ण आढळले होते, त्यामुळे ही झोपडपट्टी अत्यंत संवेदनशील बनली असून हिवताप प्रसाराचा धोका वाढला आहे.

कारगिल झोपडपट्टीत १४१ झोपड्या असून तेथे ३४० ते ३५० नागरिक राहतात. हे नागरिक परप्रांतातील असून प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील आहेत. या झोपडपट्टीतील एक व्यक्ती एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ती हिवतापबाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर महापालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभागाने तातडीने सूत्रे हलवत कारगिल झोपडपट्टीत जलद ताप सर्वेक्षण मोहीम सुरू केली.

महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्त नमुन्यांच्या तपासणीतून बुधवारी २ आणि गुरुवारी ३ असे एकूण ५ रुग्ण हिवतापबाधित आढळले आहेत. शुक्रवारी आणखी ७५ व्यक्तींचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून झोपडपट्टीत औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. नियमानुसार दोनपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास उद्रेक जाहीर केला जातो, त्यानुसार हा हिवताप उद्रेक जाहीर करून शासनाला अहवाल पाठवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT