सांगली : मालमत्ता कराच्या (घरपट्टी) थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने शुक्रवारी सलग तिसर्या दिवशी कारवाई केली. शुक्रवारी सांगलीतील 3 व मिरजेतील 1, अशा एकूण 4 मालमत्ता सील व जप्त केल्या. थकबाकीची रक्कम न भरल्यास जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल, असे आयुक्त सत्यम गांधी यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकीत कर वसुली मोहीम तीव्र केली आहे. शुक्रवारी सांगली विभागात 3, तर मिरज विभागाकडील 1 मालमत्ता जप्त केली. मिरज विभागाकडील 30 लाख रुपयांची थकबाकी वसुली झाली. सहायक आयुक्त आकाश डोईफोडे आणि त्यांच्या पथकाने अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निश्चित केलेल्या टॉप थकबाकीदारांकडून वसुली मोहीम सुरू केली. या कारवाईत सहायक आयुक्त अनिस मुल्ला, कर अधीक्षक वाहिद मुल्ला, मोहन कलगुटगी, जप्ती अधिकारी शिवाजी शिंदे, आरिफ तांबोळी, राजरतन चव्हाण, निखिल चोपडे, विनायक खैरमोडे यांनी सहभाग घेतला.
मालमत्ता कराची थकबाकी 94 कोटी रुपये आहे. वसुलीला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पन्नास हजार रुपयांवर थकबाकी असलेल्या 2 हजार 95 थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या आहेत. 5 हजार रुपयांवरील 34 हजार 195 थकबाकीदारांना नोटिसा देण्यात येत आहेत. वसुलीला प्रतिसाद न मिळाल्यास पाणी कनेक्शन तोडणे, मालमत्ता सील, जप्ती, लिलाव आदी कार्यवाही होईल. थकबाकीदारांनी थकबाकी भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले