मिरज : रस्त्यावर, निर्जन ठिकाणी अथवा एखाद्या गावातून मोटारीची चाके चोरीला गेल्याच्या घटना घडत असतात. मात्र, मिरजेत चक्क पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलिस ठाण्याच्या आवारातूनच मोटारीची चाके चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला असून, या प्रकरणी दाद मागण्यासाठी मोटार मालक ईश्वर बाबासाहेब पाटील आणि राकेश ईश्वर पाटील यांनी थेट पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
त्याचे झाले असे, मूळचे इचलकरंजी येथील ईश्वर पाटील हे नातेवाईकांच्या निधनानंतर कार्यविधीसाठी दि. २८ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्या वेळी भोसे (ता. मिरज) येथे दारूच्या नशेत असलेल्या एका दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला व ईश्वर पाटील यांच्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी ईश्वर पाटील यांनी संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अपघातानंतर आरटीओ तपासणी आणि पंचनामा करायचा असल्याने पोलिसांनी ईश्वर पाटील यांची मोटार (क्र. एमएच ०९ जीएफ २३७०) जमा करून घेतली. पोलिसांनी सांगितल्यानुसार त्यांनी सहकार्य करत मोटार जमा केली. ती मोटार मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात लावून ठेवण्यात आली होती. त्यानंतर दि. ६ ऑगस्ट रोजी 'वाहनाचा तपास पूर्ण झाला असून वाहन घेऊन जा,' असा निरोप पोलिसांकडून त्यांना देण्यात आला.
ईश्वर पाटील पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी वाहनाचा ताबा दिल्याच्या कागदपत्रांवर त्यांची सही घेतली व मोटारीची चावी हातात दिली. मात्र, जेव्हा ईश्वर पाटील वाहनाजवळ गेले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या मोटारीची सर्व चाकेच गायब होती. याबाबत त्यांनी अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ईश्वर पाटील यांनी सही केलेली कागदपत्रे परत मागितली असता ती त्यांच्यासमोर फाडून टाकण्यात आली, असा गंभीर आरोप ईश्वर पाटील यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. रात्रंदिवस पहारा असलेल्या पोलिस ठाण्याच्या आवारातूनच वाहनांची चाके चोरीला जात असतील, तर इतर ठिकाणची वाहने सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
मैदानात 'आवो जावो घर तुम्हारा'
अपघातातील आणि चोरीत सापडलेली वाहने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात लावली जातात. या ठिकाणी कोणतीही सीसीटीव्ही यंत्रणा नाही. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी निवासस्थान आणि जुन्या पोलिस लाईनकडून या मैदानात सहज प्रवेश करता येतो. मैदान पूर्णपणे बंदिस्त नसल्याने या ठिकाणी सुरक्षेचा पार बोजवारा उडाला असून 'आवो जावो घर तुम्हारा' अशी अवस्था निर्माण झाली आहे. पोलिसांनी जप्त केलेली वाहने सुरक्षित ठेवायची असतील, तर हे मैदान तातडीने बंदिस्त करण्याची गरज आहे.