सांगली : भेटायला बोलवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सरफरोश असलम समलेवाले (रा. वाघमोडेनगर, कुपवाड) याला मंगळवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ही 14 वर्षे 7 महिने वयाची असून ती आपल्या कुटुंबीयांसह शहराच्या एका उपनगरात राहते. संशयित सरफरोश समलेवाले हा कुपवाड मधील एका कापड दुकानात काम करतो. त्या कापड दुकानदाराचा आणि पीडित मुलीच्या पालकांचा एकमेकांशी परिचय आहे. त्यामुळे पीडित मुलगी आणि संशयिताची ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत संशयिताने ऑगस्टमध्ये पीडित मुलीला भेटण्यासाठी शहरातील एका शाळेजवळ बोलावून घेतले. तेथून तिला आपल्या दुचाकीवर घेऊन एका लॉजमध्ये गेला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. असाच प्रकार पुन्हा सप्टेंबरमध्येही घडला असल्याचे पीडित मुलीच्या आईने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा दाखल होताच सांगली शहर पोलिसांनी संशयितास अटक करण्यात आली आहे.