Minor girl assault case Pudhari
सांगली

Sangli minor girl assault case: अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी फरारीस अटक

मर्दवाडीत घटनास्थळी पाहणी : मुलीची आई व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

आष्टा : मर्दवाडी (ता. वाळवा) येथील एका 15 वर्षे 11 महिने वयाच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील फरार संशयित सागर बाबुराव देशमुख (वय 23) याला आष्टा पोलिसांनी सोमवारी अटक केली. पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी तिची आई आणि संबंधित डॉक्टरचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली असून, दोन अल्पवयीन संशयितांना बालसुधारगृहात धाडण्यात आले आहे.

अटक केलेला संशयित सागर देशमुख याच्यासह नितीन आनंदा यादव आणि साईराज मोहन डांगे यांना ईश्वरपूर न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमवारी पीडितेस पोलिस बंदोबस्तात मर्दवाडी येथे नेऊन घटनास्थळी पंचनामा करण्यात आला, तर मंगळवारी सांगलीतील शासकीय रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

जानेवारी 2024 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत संशयितांनी ‌‘गावात तुझी बदनामी करू‌’ अशी धमकी देऊन पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले. यातून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर, तिच्या आईने अन्य संशयितांच्या मदतीने तिला कर्नाटक राज्यात नेले. तिथे दोन अनोळखी महिलांच्या मदतीने तिचा बेकायदेशीर गर्भपात घडवून आणला. सांगली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टा पोलिसांनी मर्दवाडी येथील सहाजणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रार दडपण्याचा प्रयत्न; महिला संघटनेचा गौप्यस्फोट

या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या एका महिला संघटनेच्या अध्यक्षांनी खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही जेव्हा पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आष्टा पोलिस ठाण्यात गेलो, तेव्हा प्रकरण तडजोडीने मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हे, तर आपण पोलिस पाटील असल्याचे सांगत आरोपींच्या नातेवाईकांना घेऊन संघटनेच्या कार्यालयात आलेल्या एकाने पैसे देऊन प्रकरण दाबण्याचे आमिष दाखवले. त्यांना न जुमानता संघटनेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क साधून ऑनलाईन तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल केला.

शिक्षक आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

या सामूहिक अत्याचारात एका शिक्षकाचाही समावेश असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात काही बड्या संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ‌‘ज्या शिक्षकामुळे मुलगी गरोदर राहिली आणि ज्यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी सत्तेचा वापर केला, त्यांच्यावर अद्याप कारवाई का नाही?‌’ असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवून सेटलमेंट करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT