जत शहर : अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात पतीसह आठजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जत तालुक्यातील एका गावातील पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिचा पती, सासू-सासऱ्यांसह आठजणांवर पोक्सो, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम व बालविवाह प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता कलम (65)1 कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
जत पोलिस ठाण्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पती विजय तानाजी चव्हाण, सासू जया तानाजी चव्हाण, सासरे तानाजी हरिबा चव्हाण, चुलत सासरे दिलीप हरिबा चव्हाण, चुलत सासू पूजा दिलीप चव्हाण, चुलत सासरे सुनील हरिबा चव्हाण (सर्व रा. बेळुंखी, ता. जत) आणि नणंद अश्विनी भोसले, नणंदेचा पती योगेश भोसले (दोघे रा. माडग्याळ, ता. जत) अशी संशयितांची नावे आहेत.
संबंधित मुलीचा विवाह 17 सप्टेंबर 2025 रोजी माडग्याळ (ता. जत) येथे संशयिताच्या उपस्थितीत झाला होता. लग्नानंतर पीडिता तिच्या बेळुंखी येथील सासरी राहण्यास गेली. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही पती विजय चव्हाण याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश धसाडे करत आहेत.
नांदवण्यास नकार दिल्याने फुटले भांडे
लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या नातेवाईकांनी पीडितेस नांदविण्यास नकार दिला. यानंतर पीडिता माहेरीच राहत होती. पीडितेच्या आईने आणि नातेवाईकांनी तिला नांदवण्यास घेऊन जाण्याबाबत सासरच्या मंडळींना वारंवार विनंती केली. परंतु, पती आणि सासरच्या इतर सदस्यांनी तिला नांदवण्यास स्पष्ट नकार दिला. सासरच्यांकडून होणाऱ्या या अन्यायाला कंटाळून पीडितेने अखेर पोलिस ठाणे गाठले.