सांगली : येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील एक मेडिकल फर्म कराराने चालविण्यास घेऊन अफरातफर करीत तब्बल 41 लाख 27 हजार 314 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत फर्म चालक अर्चना सम्राट माने (वय 40, रा. आंबेडकर रस्ता, सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सविता दिनेश जाधव (रा. दत्त मंदिरजवळ, सह्याद्रीनगर, सांगली), त्यांचा पुतण्या विराज विनेश जाधव (रा. त्रिशूल चौक, सांगलीवाडी) या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी माने यांची सिव्हिल हॉस्पिटल चौकात श्री ईश्वर एजन्सी नावाची फर्म आहे. 20 वर्षे त्या हॉस्पिटल, मेडिकलला लागणारे साहित्य, सर्जिकल औषधे पुरवतात. संशयित सविता व विराज हे त्यांच्या फर्ममध्ये सर्जिकल औषधांची खरेदी, विक्री व व्यवस्थापनाची कामे करत होते. माने यांनी वैयक्तिक अडचणीमुळे या फर्मची देखरेख व व्यवस्थापनाबाबतचे अधिकार सविता व विराज यांना 7 जुलै 2021 रोजी तोंडी करारपत्राने दिले. सर्जिकल औषधांची खरेदी, विक्री यामध्ये झालेल्या नफ्यातील 60 टक्के रक्कम जाधव यांना देण्याचे ठरले होते. 6 मार्च 2023 रोजी हा करार लेखी केला होता. त्यानंतर दरमहा एक लाख रुपये देण्याचे लेखी ठरले. जाधव यांनी फर्ममधून पुरवलेल्या मालाची रक्कम वसूल केल्यानंतर ती फर्मच्या खात्यात भरण्याचे ठरले होते. मोठ्या विश्वासाने फर्मची जबाबदारी जाधव याच्यावर सोपवली होती, पण फर्ममध्ये अफरातफर होत असल्याची बाब माने यांच्या निदर्शनास आली.
संशयित सविता व विराज यांनी फर्मचे कॅश रिसिट बुक बनावट बनवून फर्मकडील ग्राहक असलेल्या मेडिकल, हॉस्पिटल यांना दिलेल्या साहित्याची, औषधाच्या बिलांची वसुली करून ती फर्ममध्ये जमा केली नाही. हिशेब तपासणी केल्यानंतर 1 जुलै 2021 ते 15 मार्च 2024 या कालावधीत 75 लाख रुपये हॉस्पिटल व मेडिकलमधून आल्याचे दिसून आले. त्यापैकी 53 लाख 90 हजार रुपयेच खात्यावर जमा केले. उर्वरित 21 लाख 12 हजार रुपये रोख रक्कम दोघांनी जमा केली नाही. तसेच ऑनलाईन पेमेंट 40 लाख 75 हजार 109 रुपये आले होते. त्यापैकी 21 लाख 2 हजार 557 रुपये खात्यावर भरले. उर्वरित 19 लाख 72 हजार 552 रुपये जमा केले नाहीत. दोघांनी 41 लाख 27 हजार 314 रुपयांची अफरातफर केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तक्रार अर्जानंतर केलेल्या चौकशीतही फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आला, त्यानंतर माने यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
चार्टर्ड अकाऊंटंट विजय नावंदर यांनी फर्मच्या मालक अर्चना माने यांना जून 2024 मध्ये लेखी पत्राने हिशेबात तफावत असल्याने पेमेंट, रोखीचे व अन्य व्यवहार तपासण्यास सांगितले. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.