Fraud Case 
सांगली

Sangli Fraud Case : सांगली मीडिया सर्व्हिसेसची ४६ लाखांची फसवणूक

विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील सांगली मीडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तब्बल ४६ लाख १२ हजार ६६७ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक राजेश मेघराज नाथानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी अजय मोहन कदम (रा. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अजय कदम हा सांगली मीडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या चिनार हॉटेल शेजारील 'कॅपिटल क्राउन' इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात कार्यरत होता. वर्ष २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत त्याच्याकडे मिरज परिसरातील ग्राहकांकडून तसेच स्थानिक कलेक्शन कर्मचाऱ्यांकडून येणारी मासिक वसुली गोळा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

संशयिताने या कालावधीत ग्राहकांकडून व कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी तब्बल ४६ लाख १२ हजार ६६७ रुपयांची रक्कम ऑनलाइन स्वरूपात स्वतःच्या खात्यावर स्वीकारली. मात्र, ही सर्व रक्कम कंपनीच्या अधिकृत बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरून अपहार केला. वसुलीबाबत कंपनी व्यवस्थापनाला वेळोवेळी खोटी माहिती देऊन दिशाभूल करत त्याने विश्वासघात केला.

अखेर वसुलीचा ताळमेळ घेताना हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर व्यवस्थापक राजेश नाथानी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT