सांगली : पुढारी वृत्तसेवा
ईपीएस-95 पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. केंद्र शासनाने हिशेबाची पद्धत बदलल्याने 2014 नंतर निवृत्त झालेल्यांना अडीच हजार रुपये पेन्शन कमी मिळत आहे. त्यामुळे असंतोष वाढला आहे. 14 ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलन होत आहे. कोल्हापूर येथे निघणार्या मोर्च्यात 2024 नंतर निवृत्त झालेल्या ईपीएस पेन्शनधारकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय पेन्शनधारक समन्वय समितीचे सरचिटणीस अतुल दिघे, सर्व श्रमिक संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष गोपाळ पाटील यांनी केले.
देशात ईपीएस-95 पेन्शनधारकांची संख्या 75 लाख इतकी आहे. त्यापैकी सुमारे 35 लाख पेन्शनधारक हे 2014 पूर्वीचे आणि 40 लाख पेन्शनधारक हे 2014 नंतरचे आहेत. केंद्र शासनाने 2014 साली ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या पेन्शन हिशेबाची पद्धत बदलली. सुमारे अडीच हजार रुपये पेन्शन कमी येत आहे. त्याचा फटका 2014 नंतरच्या पेन्शनधारकांना बसत आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पेन्शनधारकांच्या केंद्रीय समन्वय समितीने 14 ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील ईपीएस पेन्शनधारकांचा मोर्चा 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर प्रॉव्हिडंट फंड कार्यालयावर निघणार आहे. 2014 नंतर निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांनी 14 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर बसस्थानकाजवळील विक्रम हायस्कूलशेजारील मैदानावर जमावे, असे आवाहन दिघे व पाटील यांनी केले आहे.
मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका होत आहेत. शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता महादेव मंदिर इस्लामपूर, दुपारी 3 वाजता धोंडिराज मंदिर पलूस, 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता केडर ऑफिस मार्केट यार्ड जत, दुपारी 3 वाजता महांकाली मंदिर कवठेमहांकाळ, 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता अण्णा महाराज मठ तासगाव, दुपारी 2 वाजता नाथ मंदिर विटा, दुपारी 4.30 वाजता विठ्ठल मंदिर बुधगाव, 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता अंबाबाई मंदिर शिराळा, 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता कल्लेश्वर मंदिर आटपाडी, 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज, दुपारी 2.30 वाजता सांगलीत मराठा समाज संस्थेच्या पाठीमागे श्रमिक कार्यालय सीतारामनगर येथे बैठक होणार आहे. या बैठकीला तसेच मोर्चाला सन 2014 नंतर निवृत्त झालेल्या ईपीएस-95 पेन्शनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
देशात ईपीएस-95 पेन्शनधारकांची संख्या सुमारे 75 लाख इतकी आहे. दरमहा किमान पेन्शन 700 ते कमाल 4 हजार 250 रुपये आहे. ईपीएस-95 पेन्शनधारकांची अतिशय तुटपुंजा पेन्शनवर बोळवण केली जात आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, अशी माहिती अतुल दिघे व गोपाळ पाटील यांनी दिली.