Sangli Municipal Corporation Pudhari
सांगली

Sangli News : शहरातील गॅस वाहिनीचे काम थांबवण्याचे महापौरांचे आदेश

महापालिकेच्या जलवाहिन्या, ड्रेनेज वाहिन्या फोडल्याने संताप : परवानगीपेक्षा जादा खोदाई; फौजदारीचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरात गॅस वाहिनीसाठी रस्ता खोदाई करताना कंपनीकडून मनमानी होत आहे. महापालिकेशी समन्वय न ठेवता ड्रलिंग केले जात असल्याने जलवाहिन्या, ड्रेनेजवाहिन्या फुटत आहेत. महापालिकेकडून 204 किलोमीटर रस्ता खोदाईची परवानगी घेतली, पण प्रत्यक्षात जादा खोदाई केल्यावरून महापौर धीरज सूर्यवंशी संतप्त झाले. गॅस वाहिनीचे काम तातडीने थांबवून झालेल्या कामाची चौकशी करा. पुढील महासभेत अहवाल सादर करा. आदेशाचे उल्लंघन करून काम सुरू ठेवल्यास गॅस कंपनीवर फौजदारी दाखल करा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिकेत सोमवारी विशेष महासभा झाली. महापौर धीरज सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर गजानन मगदूम, आयुक्त सत्यम गांधी तसेच अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. महासभेत गॅसवाहिनीचा विषय गाजला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड म्हणाले, सांगली व कुपवाड शहरातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 17, 19 मध्ये गॅस वाहिन्यांचे काम करण्यासाठी महापालिकने एका पेट्रोलियम कंपनीला परवानी दिली आहे. कंपनीने परवानगीपेक्षा जादा खोदाई केली आहे. जलवाहिन्या व ड्रेनेज लाईन फोडल्या आहेत. त्याची दुरूस्ती सहा महिने झाले तरी केली नाही. कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

जगन्नाथ ठोकळे म्हणाले, गॅस वाहिनी टाकताना जलवाहिनी फुटल्यास आठ दिवसात दुरूस्त करण्याचे करारपत्रात नमूद केले आहे. शिवाय कोणत्याही भागात काम सुरू करण्यापूर्वी एक दिवस अगोदर नगर अभियंत्यांनी पाहणी करायची आहे. पण परस्पर काम सुरू आहे.

माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, प्रभाग क्रमांक 17 मध्ये गॅस वाहिनीचे काम करताना नवीन केलेला 550 मीटर रस्ता उकरला आहे. दत्तनगर, गुलमोहर कॉलनी येथे जलवाहिनीमधून गॅस वाहिन्या टाकल्या आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी कंपनीने 7.04 कोटी रुपये भरून घेतले आहेत. ही रक्कम खोदाई केलेल्या चरी बीबीएम करून मुजविण्यासाठी होते. मात्र तत्कालिन आयुक्तांनी ही रक्कम परस्पर जनरल फंडाला वर्ग केली. त्यामुळे संबंधित रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. डांबरी व काँक्रिटचे रस्ते उकरले आहेत. अर्थसंकल्पात तरतूद करून पॅचवर्क करून द्यावे, अशी मागणी केली. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी कंपनीच्या कामावर संताप व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT