Sangli Mayor election Pudhari
सांगली

Sangli Mayor Election : नेत्यांची तलवार म्यान; काँग्रेस नगरसेवकांमध्ये सन्नाटा

महापौर, उपमहापौर निवडणुकीत बघ्याची भूमिका : तर्क-वितर्क,चर्चांना फुटले धुमारे

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आम्हीही महापालिकेत सत्तास्थापनेच्या शर्यतीत असल्याचे जाहीर करणाऱ्या काँग्रेसने बुधवारी महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही दाखल न करता सपशेल माघार घेतली. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढवावी, असे मत काँग्रेसच्या काही नगरसेवकांचे होते. मात्र नेत्यांनी तलवार म्यान केल्याने काँग्रेस नगरसेवकांचा नाईलाज झाला. नेत्यांपुढे आपले मत रेटता आले नाही. नेत्यांचेही काही गणित असावे, अशी मनाची धारणा बनवत त्यांनी लढण्याऐवजी अखेर बघ्याची भूमिका घेतली. एकूणच महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी न दिल्याने काँग्रेसची भूमिका मात्र चर्चेत राहिली आहे.

महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपला 39 जागा मिळाल्या. भाजपचे बहुमत एका जागेने हुकले. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. महापालिकेची निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने या आघाडीशी अघोषित समझोता करून निवडणूक लढवली होती. शिवसेनेला भाजपने जवळ केले नव्हते. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सत्तास्थापनेकडे लक्ष लागले होते.

काँग्रेसही होती शर्यतीत..!

काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना या चार पक्षांचे एकूण संख्याबळ 39 आहे. चार पक्षांना एकत्र घेऊन महापालिकेत काँग्रेस सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करेल, असे पक्षाच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते संपर्कात आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे सत्तास्थापनेचा सस्पेन्स निर्माण झाला होता. मात्र भाजपने शिवसेनेशी बोलणी सुरू करत बहुमत प्राप्त केल्याचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाशीही बोलणी करून महापालिकेत तगडे बहुमत प्राप्त केले. तरिही महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक काँग्रेसकडून लढवली जाईल, अशी स्पष्ट धारणा होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी न देऊन राजकीय जाणकारांनाही आश्चर्य वाटावे, अशी भूमिका घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT