Sangli Mayor election Pudhari
सांगली

Sangli News : महापौर भाजपचा, उपमहापौर राष्ट्रवादीचा

सत्तास्थापनेचा तिढा सुटला : धीरज सूर्यवंशी होणार महापौर; स्थायीचे सभापतिपदही भाजपकडे

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला. महापौर भाजपचा आणि उपमहापौर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा होणार आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपकडे राहणार आहे. भाजप-शिवसेना यांच्यातही चर्चा सुरू आहे. मात्र, पहिल्या टर्ममध्ये तरी शिवसेनेला कोणतेही पद मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत. दरम्यान, महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी यांची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र, हे पद दहा महिन्यांसाठी की सव्वा वर्षासाठी असणार, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेत भाजपला सर्वाधिक 39 जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी केवळ एका जागेची आवश्यकता आहे. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 16, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. महापालिका निवडणुकीत महायुती झाली नव्हती. शिवसेना स्वतंत्र लढली होती, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाशी अघोषित समझोता केला होता. दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपचे बहुमत एका जागेने हुकले. त्यामुळे भाजपने

शिवसेनेशी चर्चा सुरू केली. मात्र स्थायी समितीमध्ये बहुमतासाठी राष्ट्रवादीलाही सत्तेत सामावून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र आता शिवसेनेसोबत चर्चा सुरू ठेवत भाजपने राष्ट्रवादीशी सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.

महापौर पद भाजपला, तर उपमहापौर पद राष्ट्रवादीला मिळणार आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपकडेच राहणार आहे. महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी, अतुल माने, रोहिणी पाटील, स्वाती शिंदे, लक्ष्मण नवलाई अशी इच्छुकांची यादी मोठी आहे. निरंजन आवटीही इच्छुकांच्या यादीत होते. मात्र त्यांचे बंधू संदीप आवटी यांची महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्याने निरंजन यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीतून मागे पडले आहे. महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड निश्चित मानली जात आहे. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून अभिजित भोसले, अतहर नायकवडी, साक्षी बोरगावे, करण जामदार, गजानन मगदूम यांचे नाव चर्चेत आले आहे. महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी विशेष सभा 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता महापालिका मुख्यालयात पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात होणार आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 4 फेब्रुवारीस दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. भाजपतर्फे महापौर पदासाठी सोमवारी गटनेत्यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT