सांगली : गेली काही वर्षे बंद असलेल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह व परिसराची स्वच्छता करण्यात आली.  
सांगली

Sangli News| दीनानाथ नाट्यगृह पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल

नाट्यगृह परिसर झाला स्वच्छ ; छत, खुर्च्यांची दुरुस्ती, रंगमंचाची सुधारणा होणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह पुन्हा सुरू करण्याच्या महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेला आता प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे. महापौरांच्या पुढाकाराने शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून नाट्यगृह आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. आता नाट्यगृहाचे छत, खुर्च्यांची दुरुस्ती आणि रंगमंचाची सुधारणा होणार आहे.

महापुरानंतर अनेक दिवसांपासून बंद असलेल्या या नाट्यगृहाची महापौर धीरज सूर्यवंशी यांनी नुकतीच उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त पराग कोडगुले आणि शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत पाहणी केली होती. यावेळी नाट्यगृहाची झालेली दुरवस्था, वाढलेली झाडीझुडपे आणि परिसरात साचलेला कचरा लक्षात घेऊन त्यांनी तातडीने स्वच्छता व दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शनिवारी स्वच्छता मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. या मोहिमेत मुख्य स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, स्वच्छता अधिकारी अतुल आठवले, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे यांच्यासह स्वच्छता विभागाच्या पथकाने सहभाग घेतला. नाट्यगृहाच्या अंतर्गत भागासह बाहेरील परिसरातील कचरा हटविणे आणि झाडीझुडपे काढण्याची कामे करण्यात आली.

आता प्रेक्षक आणि कलाकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही महापालिका प्रशासनाचा भर राहणार आहे. यासाठी महापौरांनी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. नाट्यगृहाच्या छताची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी पत्रे बसविणे, खराब खुर्च्यांची दुरुस्ती, रंगमंचाची सुधारणा, कलाकारांसाठी मेकअप रूम तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्ती अशा कामांचे नियोजन करण्यात येत आहे. ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून नाट्यगृह पुन्हा वापरात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी महापौरांनी घेतलेल्या पुढाकाराचे सांगलीतील कलाकार, नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांकडून स्वागत होत आहे. नगरसेवक केदार खाडिलकर आणि उदय बेलवलकर यांनीही या निर्णयाचे स्वागत करून नाट्यगृह लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक सूचना मांडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT