Sangli Mayor election Pudhari
सांगली

Sangli Mayor Election: महापौर, उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला

अर्ज दाखल प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून : इच्छुकांची मोर्चेबांधणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महापालिकेची महापौर, उपमहापौर निवडणूक मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी होईल. त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आणि राजकीय हालचालींना गती आली आहे. सत्तास्थापनेसाठी भाजप महायुतीचे संकेत मिळत असून, वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयासाठी मुंबईकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्याही हालचाली सुरू आहेत.

आरक्षण सोडतीनंतर महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर दि. 10 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला. महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी दि. 2 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. बुधवार, दि. 4 फेब्रुवारीस दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असेल.

महापालिकेत एकूण 78 जागांपैकी भाजपला 39, काँग्रेसला 18, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजप व शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी केली होती, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी अघोषित समझोता करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर युती, आघाडी कशी आकार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

भाजपचे बहुमत एका जागेने हुकले आहे. मात्र, शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याचे भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते. मात्र, स्थायी समितीत बहुमतासाठी भाजपला राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांनीही, आम्ही सत्तास्थापनेच्या स्पर्धेत असल्याचे सांगत सस्पेन्स निर्माण केला होता.

मात्र भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुती होईल, असे संकेत मिळत आहेत. महापौर पदासाठी भाजपमधून निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, रोहिणी पाटील, अतुल माने, ॲड. स्वाती शिंदे, अनिता पवार यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. धीरज सूर्यवंशी यांच्या पाठीशी पालकमंत्र्यांचे बळ राहील, अशी चर्चा आहे.

दरम्यान, 2021 मध्ये महापौर पदासाठी भाजपकडून निरंजन आवटी हेही इच्छुक होते. त्यावेळी धीरज सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे यावेळी प्रथम निरंजन आवटी यांच्यारूपाने मिरजेला संधी द्यावी, अशी मागणी मिरजेतून रेटली जात आहे. अतुल माने हे आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक आहेत. तेही जोरदार प्रयत्न करत आहेत. रोहिणी पाटील यांनीही महापौर पदासाठी जोरदार मार्चेबांधणी केली आहे. त्यांच्यासाठी भाजप नेत्या जयश्री पाटील विशेष आग्रही आहेत.

भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या त्या भगिनी आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीलाही बळ मिळत आहे. ॲड. स्वाती शिंदे यांनीही महापौर पदासाठी प्रबळ दावेदारी केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ॲड. स्वाती शिंदे यांना महापौर पदाचा शब्द दिला असल्याकडे कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत. तसेच अनिता पवार (शिवप्रतिष्ठान) यांच्यासाठीही समर्थकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT